पुणे महानगरपालिका कामगार युनियन कडून कामगारांना सूचना.

पुणे, दि २५ जून २०२०: लॉकडाऊनचा काळात देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. सध्या लॉकडाऊन हळूहळू उघडले जात असले तरीही या आधीचे तीन महिने हे खूप भयानक गेले आहेत. सर्व कामे ठप्प झाल्यामुळे लोकांचे रोजगार बंद राहिले होते. परिणामी उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे आर्थिक कोंडी होण्यास सुरुवात झाली होती. सध्या शिथिलता देण्यात आली असली तरी लोकांच्या आर्थिक समस्या संपलेल्या नाहीत. परंतू आता याचा काही लोक गैरफायदा घेत असल्याचे बघण्यास मिळत आहे. असाच एक प्रकार वारजे-माळवाडी, कर्वेनगर या भागांमध्ये समोर आला आहे.

सिटू नाव असलेली एक संस्था अडचणीत सापडलेल्या लोकांना केंद्र सरकार कडून १०,००० रुपये दरमहा मदत मिळण्याबाबत मागणी केल्याचे सांगत आहे. याचा लाभ कामगारांना मिळेल असे आश्वासन देत सिटूचे नेते प्रकाश जाधव व त्यांचे कार्यकर्ते वारजे माळवाडी-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यलयातील कोठ्यांवर जाऊन महानगरपालिकेमधील कामगारांकडून अर्ज भरून घेत आहेत व अर्ज भरून घेत असताना सोबत कामगारांकडून सभासद नोंदणी म्हणून दोनशे रुपयांची देखील मागणी करत दोनशे रुपये घेत आहेत.

पैसे मिळवून देऊ असे खोटे आश्वासन देत अर्ज कामगारांकडून भरून घेत आहेत. कामगार अशिक्षित असल्याने अशा प्रकारे अर्ज भरून देतात. त्यामुळे कामगारांकडून पैसे उकळण्याचे काम या संघटनेचे सुरू आहे. तसेच या अर्जा मध्ये एक टिप दिलेली आहे, त्यामध्ये असे नमूद आहे की, हा अर्ज मोफत आहे. तरी ही अर्ज भरून घेताना दोनशे रुपये घेतले जात आहेत.

ही सर्व बाब लक्षात येताच पुणे महानगरपालिका कामगार युनियन मान्यताप्राप्तच्या अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी अशा कोणत्याही प्रकारची रक्कम मिळणार नसल्याचा खुलासा केला व कामगारांनी अशा कोणत्याही प्रकारचे अर्ज भरून देऊ नये. कामाचा ठिकाणी कोट्यांवर असे कोणी अर्ज भरण्यासाठी आले तर अर्ज भरून देऊ नये अशा सूचना देण्यात आल्या. ही कामगारांची फसवणूक केली जात असल्याचे जाहीर केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी अयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा