मुंबई, १९ जानेवारी २०२३ :’अशी चिकमोत्याची माळ’ हे गाणे संगीतबद्ध केलेले संगीतकार निर्मल मुखर्जी यांचे निधन झाले आहे. बुधवारी पहाटे मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. विविध वाद्यांवर यांची घट्ट पकड होती.
मिळालेल्या माहितीनुसार, निर्मल मुखर्जी यांना मंगळवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, उपचारांदरम्यानच बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. साकीनाक्याजवळील स्मशानभूमीत निर्मल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
निर्मल मुखर्जी यांचे वडील चित्रपट निर्माते होते. दादर येथील त्यांच्या मालकीच्या हॉलमध्ये अनेक संगीतकार आणि वादक सरावासाठी येत असते. या वातावरणाचा परिणाम निर्मल यांच्यावर झाला. वयाच्या १४ व्या वर्षी ते म्युझिक असोसिएशनचे सदस्य झाले होते. बॉन्गो, काँगो, तुंबा, दबुरका, डी- जेंबे विविध वाद्यांवर त्यांची हुकूमत होती. पंधरा हजाराहून जास्त गाण्यात त्यांचा सहभाग होता. हिंदीसह बंगाली आणि मराठी गाण्यांसाठी त्यांनी संगीतकार आणि वादक म्हणून काम केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.