जालना कारागृहातील १५ कैद्यांना अंतरिम जामीन

जालना, दि.१६ मे २०२०: कोरोना महामारीचा फैलाव कारागृहात होऊन उद्भवणाऱ्या संकटावर खबरदारी म्हणुन राज्याच्या उच्चाधिकार समितीने दिलेल्या निर्णयामुळे अनेक कैद्यांच्या अंतरीम जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

यामध्ये महिला अत्याचार, बाललैंगिक गुन्हे व मोठ्या आर्थिक गुन्ह्यातील आरोपी वगळता इतर गुन्ह्यातील परंतू सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकतील अशा न्यायालयीन कोठडीतील कैद्यांना यामुळे लाभ मिळणार आहे. याचाच भाग म्हणुन जालना जिल्हा कारागृहातील १५ कैद्यांना अंतरीम जामीनही मिळाला आहे.

जालना जिल्हा कारागृहात सध्या २१० बंदी असुन त्यामध्ये १५ महिला व दोन बालके तसेच इतर पुरुष कैद्यांचा समावेश आहे. जालना जिल्हा कारागृहात फक्त एकच शिक्षाबंदी असल्याने त्यास यापुर्वीच ४५ दिवसांची पॅरोल रजा मिळाली असून लाॅकडाऊन मध्ये वाढ झाल्यास या पॅरेलमध्येही टप्प्याटप्प्याने तीस दिवसांची वाढ होऊ शकते अशी माहिती कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांनी दिली.

जालना जिल्हा कारागृहात सध्या असलेल्या कैदींना महाराष्ट्र राज्याच्या उच्चाधिकार समितीने कोरोना पार्श्वभुमिवर दिलेल्या अंतरीम जामीनाच्या आदेशानुसार जामीनाची प्रक्रिया सुरु असल्याचेही त्यांनी सांगीतले.

महाराष्ट्र राज्य उच्चाधिकार समितीने दिनांक ११ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार बँक व मोठमोठे आर्थिक घोटाळे, मोक्का, टीएडीए, पीओटीए, एमपीएल, एनडीपीएस, एमपीआयडी, पोक्सो तसेच कारागृहात असलेल्या विदेशी कैद्यांना हे आदेश लागू नाहीत.  परंतु इतर किरकोळ गुन्ह्यासह खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील कैद्यांचे अर्ज या अंतरीम जामीनासाठी येत असल्याचे कारागृहातील सुत्रांनी सांगीतले. असे असले तरी कोरोना महामारीमुळे या कैद्यांना अंतरीम जामीनाच्या आधारावर आपल्या घरी जाण्याचा मार्ग तात्पुरता मोकळा झाला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा