मणिपूर राज्यात दीड महिन्यापासून इंटरनेट बंद

मणिपूर २३ जून २०२३: मणिपूरमध्ये ३ मे रोजी सुरू झालेल्या हिंसाचारानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ मे पासून इंटरनेट बंद करण्यात आले, येत्या २५ जूनपर्यंत ते बंदच राहणार आहे. यानंतरही ते सुरू होण्याची शाश्वती नाही. हिंसाचार सुरूच राहिल्यास सरकार ते आणखी पुढे नेऊ शकते. सरकारने अनेक वेळा इंटरनेट बंदीचे आदेश दिले, त्यामुळे मणिपूरमधील शांतताप्रेमी जनतेला दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे दंगलखोर त्रास देत आहेत, तर दुसरीकडे शिक्षणापासून ते व्यवसायावरही वाईट परिणाम झाला आहे.

शाळा, महाविद्यालये आधीच बंद आहेत. कोविड परिस्थितीपेक्षा जास्त इंटरनेट बंदचा अभ्यासावर वाईट परिणाम होत आहे. कोविडच्या दिवसांत इंटरनेट सुरू असताना ऑनलाइन अभ्यास सुरू होता, पण यावेळी ती सुविधा बंद झाल्यामुळे मणिपूरचे विद्यार्थी चिंतेत आहेत. हिंसाचारानंतर देशाच्या इतर भागांतील संस्था सोडून यावे लागल्याने, घरी परतलेले विद्यार्थीही चिंतेत आहेत.

मणिपूरचे मूळ रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते मोंटू अहंथम यांनी फोनवरील संभाषणात सांगितले की, इंटरनेट बंद झाल्यामुळे सर्व काही ठप्प झालय. आम्ही शिबिरांमधून सतत काम करत आहोत. व्हॉट्सअॅप कार्यान्वित नसल्यामुळे सहकाऱ्यांशी संवाद साधता येत नाही. छावण्यांमधील लोकांचे जीवन अडचणींनी भरलेले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी फोन हा एकमेव आधार आहे.

ऑनलाइन मनी ट्रान्सफरची सर्व साधने फोनमध्ये निरुपयोगी ठरत आहेत, यामुळे वृद्ध, लहान मुळे सर्वच जण त्रासलेले आहेत. मणिपूरच्या शांतताप्रिय लोकांची इच्छा आहे की, सरकारने संपूर्ण इंटरनेटवर नव्हे तर सोशल मीडियावर बंदी घालावी. त्यामुळे दोन्ही कामे सहज होतील. सोशल मीडियाच्या माध्यमातून नकारात्मक प्रचार होणार नाही आणि शांतताप्रेमी लोकांचीही गैरसोय होणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा