पुणे , २८ जानेवारी २०२१ : दिल्लीमध्ये होणारे शेतकरी आंदोलन देशाचे एक नागरिक म्हणून कसे समजून घ्यावे? यात नागरिकांची भूमिका काय असावी यासाठी युवक क्रांती दलामार्फत एस एम जोशी सभागृह, पुणे येथे जाहीर सभा घेण्यात आली.
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरुद्ध चालू झालेले शेतकरी आंदोलन अजूनही चालूच आहे. शेतकरी आपल्या मागण्यासाठी थंडी-वारा यांची पर्वा न करता दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत.या सर्व गोष्टींच्या दरम्यान दिल्ली आंदोलनासंदर्भात बऱ्याच गोष्टी माध्यमांद्वारे कळत आहेत. प्रत्येक माध्यमांच्या स्वतःच्या एका धोरणानुसार बातमीचा प्रसार होतो आणि या सर्वांमध्ये सामान्य जनता बराच वेळा बातम्यांच्या गर्दीत चूक आणि बरोबर यातील फरक करण्यास चुकते. याच गोष्टींचा विचार करता समाजासाठी कायम लढणारा, लढाऊ, अहिंसा व सामुदायिक संघर्ष, सत्याग्रह, आंदोलन, सत्याच्या पाठीशी सामर्थ्याने उभे राहणारा युवक क्रांती दल (युक्रांद). या संघटनेने वेगवेगळ्या विषयांचे अभ्यासक ज्यांनी हा विषय वेगवेगळ्या पातळीवर समजून घेतला आहे. त्यांच्या याच दृष्टिकोनातून हा विषय समजून घेऊन चूक आणि बरोबर यातील फरक करणे नागरिकांना सोपे जावे आणि लोकांपर्यंत वास्तविकता पोहोचावी यासाठी एस एम जोशी येथे जाहीर सभा घेतली.
चर्चेसाठी आमंत्रित व्याख्यात्यांमध्ये आर्थिक राजकीय व्यवहाराचे अभ्यासक प्रसाद झावरे यांनी सरकारच्या नोटबंदी, जीएसटी, एनआरसी सारखे निर्णय कसे घाईने लादले गेले तसेच शेती कायद्यामधील तरतुदी कशा चुकीच्या आहेत यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, शेती विषयक कायदे वाईट असण्यापेक्षा त्यामागचा उद्देश वाईट आहे. विकल्या जाणाऱ्या सरकारी कंपन्या आणि कोण विकत घेत आहे याकडे लक्ष दिले पाहिजे. नव्या शेती कायद्यासंदर्भात बोलताना त्यांनी मोठ्या-मोठ्या मोबाईल कंपन्या खुल्या बाजारात टिकल्या नाहीत, तर शेतकरी, दलाल-अडते काय टिकतील अशा शब्दात कायद्याने शेतकरी आणि त्या संबंधित असणाऱ्यांची दशा काय होईल हे सांगितले.
याच जोडीला कृषी अभ्यासक दिपक गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थचे गणित मांडले, शेतीत दोन टक्क्यापर्यंत होणारा नफा आणि तोही पाच वर्षातून एकदाच होतो अशा परिस्थितीत ते जगत असतात.यासाठी मध्यमवर्गाने संवेदनशील रीतीने कार्यरत राहण्याची गरज असल्याची ते म्हणाले. शेतकरी हा जगातील आदर्श व्यवस्थापक आहे, त्यामुळे हवा कुठे चालली आहे याचा अंदाज त्याला सर्वप्रथम येतो पण त्याचे कोणाला कौतुक नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अर्थकारणाचा पाया असलेल्या शेतीकडे , कृषी अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले तर या असंतोषाचा कधीही स्फोट होऊ शकतो असेही ते म्हणाले.
सभेच्या अध्यक्षपदी असणारे युक्रांदचे उपाध्यक्ष रवींद्र धनक यांनी तर देशभक्ती म्हणजे काय? असे कोणी विचारले तर या प्रश्नाचे उत्तर काय असेल, असे सांगताना ते म्हणतात, “आजच्या घडीला देशातील सामाजिक-आर्थिक धोरण समजून घेणं महत्वाचं आहे. केवळ समजून घेणं नाही तर त्याच्या बाबतीत गंभीर असणं महत्वाचं आहे. फक्त गंभीर असणं महत्वाचं नाही तर सजग असणं महत्वाचं आहे आणि नुसतं सजग नव्हे तर सक्रिय असणं महत्वाचं आहे”. हा मोठा संदेश त्यांनी समाजातील मध्यमवर्गाला दिला. शेतकरी आंदोलनावर बोलताना त्यांनी शेतकऱ्याची अवस्था सांगितली कि कसा शेतकरी कायम तोट्यात असतो; एनपीए मध्ये जगतो; कशी आर्थिक व्यवस्था बांडगुळासारखी मध्यमवर्गापासुन सर्वांचे शोषण करते आणि यासाठी मध्यमवर्गाने जागे होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले व जोडीला या वर्गाची ताकद सांगितली. तसेच युवक क्रांती दलाचे राज्य सहकार्यवाह आप्पा अनारसे- जे स्वतः दिल्ली आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आले त्यांनी दिल्ली येथील आंदोलनातील लोकांमध्ये असणारा व्यक्तशीरपणा आणि बाहेरून येणाऱ्या लोकांप्रती त्यांच्या मनात असणारी प्रेमाची भावना आणि लढण्याची जिद्द यावर प्रकाश टाकला. तसेच सरकार आंदोलन हाताळण्यात कसे निकामी ठरते आहे यावरही त्यांचे काही विशेष अनुभव सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे