पुणे, 3 जानेवारी २०२१ : रेशन कार्ड देताना निरीक्षक व परिमंडळ अधिकाऱ्यांकडून नियमा बाहेरील पुराव्यांची मागणी करत रेशन कार्ड देण्यासाठी नियमापेक्षा जास्त दिवस लागत असल्याबाबत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर च्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.
पुणे शहरातील आठ विधानसभा क्षेत्रातील शिधावाटप परिमंडळ क्षेत्राच्या विविध शिधापत्रिका कार्यालय पुरवठा निरीक्षक व परिमंडळ अधिकारी सर्वसामान्य नागरिकांकडून नियमात बाहेरील जास्त पुराव्यांची मागणी करून त्यांच्या शिधापत्रिका मिळण्यापासून वंचित ठेवून अस्तित्वात नसलेल्या कायद्याचे भय घालून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार चालू आहेत,असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते संदीप काळे यांनी हे निवेदन सादर करताना सांगितले.
पुरवठा निरीक्षक परिमंडळ अधिकारी आणि परवानाधारक शिधा वाटप दुकानदारांची अभद्र युतीमुळे स्थळ पाहणी करतेवेळी पुरवठा निरीक्षक सर्रासपणे स्थानिक परवानाधारक शिधावाटप दुकानदारांचे मत विचारात घेऊनच स्थळ पाहणी अहवालात नियमापेक्षा वेगळ्या पुराव्यांची मागणी करत आहेत.या कारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागू नये पुरवठा निरीक्षक यांनी अतिरिक्त पणे मागणी केलेल्या पुराव्यांची पूर्तता करण्यासाठी रोजगार बुडवून धावाधाव करावी लागते. हा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय असून या तक्रार अर्जांची गंभीरपणे दखल घेऊन सर्वसामान्य नागरिकांची शिधापत्रिका बाबतची सर्व प्रकारची कामे त्वरित करण्यात यावी तसेच नागरिकांकडून कोणत्याही नियमांत बाहेरील अतिरिक्त पुराव्यांची मागणी करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रकरणी सात दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तीव्र आंदोलन करून सर्व परिमंडळ कार्यालयात टाळे लावण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे