ठाणे १४ जून २०२३: मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदलीवरुन भाजप आणि शिंदे गटाच्या युतीत मिठाचा खडा पडला आहे. भाजपने ताकदीचा उमेदवार दिल्यास खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवून खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपलाच आव्हान दिले होते. यातून युतीमध्ये तणाव निर्माण झाला असताना आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याबाबतचे पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केल्याने ठाणे जिल्ह्यातील पोलिस दलात खळबळ उडाली आहे. डोंबिवलीचे भाजपचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर मानपाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा शिंदे गटाच्या दबावातून दाखल करून घेण्यात आल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर भाजपच्या बैठकीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांची बदली होत नाही, तोपर्यंत खासदार शिंदे यांचा प्रचार करणार नाही असे ठरले.
या प्रकरणानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला. या वादात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उडी घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. आता बागडे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर