नवी दिल्ली, ६ एप्रिल २०२१: थेट परदेशी गुंतवणूकीसंदर्भातील धोरणसुधारणा अमलात आणत सरकारने केलेल्या उपाययोजना, गुंतवणूक सुलभता आणि व्यापारसुलभता (इज ऑफ डुईंग बिजनेस) यामुळे देशातील थेट परदेशी गुंतवणूकीत सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत ७२.१२ अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यात झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक असून, २०१९-२० या वर्षातील ६२.७२ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणूकीशी तुलना करता ती १५ टक्क्यांनी जास्त आहे.
एकंदर कल बघता आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या १० महिन्यातील ५४.१८ अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक ही गेल्या वर्षाच्या याच कालावधीतील ४२.३४ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या थेट परदेशी गुंतवणूकीच्या तुलनेत २८% नी वाढलेली दिसून येते. चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये थेट परदेशी गुंतवणूकीच्या ३०.२८% गुंतवणुक करत सिंगापूरने गुंतवणूकदार देशांमध्ये आघाडी घेतली आहे, तर एकूण थेट परदेशी गुंतवणूकीपैकी अनुक्रमे २४.२८% व ७.३१% चा वाटा उचलत अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात त्यापाठोपाठ आहेत.
जानेवारी २०२१ मध्ये थेट परदेशी गुंतवणूकीच्या २९.०९% इतकी गुंतवणुक करत जपान गुंतवणूकदार देशांच्या यादीत आघाडीवर आहे. तर एकूण गुंतवणूकीपैकी अनुक्रमे २५.४६% आणि १२.०६% गुंतवणूक करत सिंगापूर तसेच अमेरिका दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
कॉंप्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या क्षेत्राने सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक आणली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये झालेल्या एकूण थेट परदेशी गुंतवणूकीच्या ४५.८१% कॉंप्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात झाली आहे. त्याखालोखाल बांधकामातील पायाभूत सुविधा क्षेत्राने १३.३७% थेट परदेशी गुंतवणूक तर सेवा क्षेत्राने ७.८०% थेट परदेशी गुंतवणूक देशात आणली आहे.
एकूण कल बघता जानेवारी २०२१ मध्ये सल्लागार-सेवा हे एकूण थेट परदेशी गुंतवणूकीच्या २१.८० % गुंतवणूकीसह सर्वात आघाडीचे क्षेत्र आहे. एकूण थेट परदेशी गुंतवणूकीपैकी १५.९६% गुंतवणूक आणणाऱ्या कॉंप्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्राचा तसेच १३.६४% गुंतवणूक आणणाऱ्या सेवा क्षेत्राचा क्रमांक त्यानंतर लागतो.
भारतातील थेट परदेशी गुंतवणूकीचा कल दाखवणारी ही आकडेवारी जगभरातील देशांमध्ये गुंतवणूकीयोग्य देश म्हणून भारताला मिळणारी वाढती मान्यता दर्शवत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे