IPL: मुंबईवर केकेआरचा एकतर्फी विजय, अय्यर-त्रिपाठीची झंझावाती खेळी

अबुधाबी, 24 सप्टेंबर 2021: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 14 व्या हंगामाचा 34 वा सामना अबुधाबीमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात खेळला गेला. व्यंकटेश अय्यर (53) आणि राहुल त्रिपाठी (नाबाद 74) यांच्या शानदार डावांच्या जोरावर कोलकात्याने मुंबईचा 7 गडी राखून पराभव केला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने तिन्ही विकेट्स घेतल्या.

या विजयासह कोलकाताचे 8 गुण झाले आहेत. त्यांनी गुणतालिकेत चौथे स्थान गाठलं आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं 20 षटकांत 6 गडी गमावून 155 धावा केल्या. केकेआरनं 156 धावांचं लक्ष्य 15.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केलं.

156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यरनं कोलकाताला झटपट सुरुवात केली आणि 3 षटकांत 40 धावा जोडल्या. शुभमन गिल (13) बुमराहच्या पहिल्या षटकात बळी गेला. यानंतर राहुल त्रिपाठी मैदानावर उतरला.

व्यंकटेश आणि राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 88 धावा जोडल्या. वेंकटेशनं आपल्या 30 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याला डावाच्या 12 व्या षटकात बुमराहनं पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. कर्णधार इऑन मॉर्गन (7) यालाही बोल्टच्या हाती बुमराहनं झेलबाद केलं.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 बाद 155 धावा केल्या. यामुळं मॉर्गनच्या कर्णधारपदाच्या संघाला विजयासाठी 156 धावांचं लक्ष्य मिळालं. सलामीवीर क्विंटन डी कॉकने मुंबईसाठी 55 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार रोहित शर्माने 33 धावांचं योगदान दिलं. केकेआरकडून वेगवान गोलंदाज कृष्णा आणि लॉकी फर्ग्युसनने 2-2 विकेट्स घेतल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा