यूएई, 26 सप्टेंबर 2021: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 14 व्या हंगामाच्या 37 व्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव केला. या विजयामुळं पंजाबच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत आहेत. ती गुणतालिकेत पाचव्या स्थानी आली आहे. त्याच्या 10 सामन्यांमध्ये 8 गुण आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 125 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 120 धावा करू शकला.
126 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. डेव्हिड वॉर्नर 2 आणि कर्णधार केन विल्यमसन फक्त एक धाव करू शकले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दोघांची विकेट मिळवली. संघाने 60 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या.
मनीष पांडेने 13, केदार जाधवने 12 आणि रिद्धीमान साहाने 31 धावा केल्या. लेगस्पिनर रवी बिशनाईने 24 धावांत 3 बळी घेतले. जेसन होल्डर 47 धावांवर नाबाद राहिला, पण तो संघाला जिंकू शकला नाही. त्याने 29 चेंडूत 5 षटकारही लगावले. हैदराबादला शेवटच्या 3 षटकांत 30 धावा करायच्या होत्या. पण पंजाबच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना धावा करू दिल्या नाहीत.
अशी होती पंजाब किंग्जची खेळी
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबला डावाच्या 5 व्या षटकात पहिला धक्का मिळाला आणि केएल राहुल (21) ला सुचितच्या हाती जेसन होल्डरने झेलबाद केलं. त्याने 21 चेंडूत 3 चौकार मारले. त्याच षटकाच्या 5 व्या चेंडूवर मयांक अग्रवाल (5) देखील पॅव्हेलियनमध्ये परतला आणि विल्यमसनच्या हाती झेलबाद झाला. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या सामन्यात जोरदार फलंदाजी केली.
ख्रिस गेल सुद्धा फार काही करू शकला नाही आणि 1 चौकाराच्या मदतीने 17 चेंडूत 14 धावा करून रशीद खानचा बळी ठरला. निकोलस पूरन (8) संदीप शर्माचा बळी ठरला आणि त्याच्याच चेंडूवर झेलबाद झाला. एडन मार्करामने पंजाबसाठी 27 धावांचं योगदान दिलं. जेसन होल्डरने 4 षटकांत फक्त 19 धावा देऊन 3 बळी घेतले. वेगवान गोलंदाज संदीप शर्मा, भुवनेश्वर कुमार, रशीद खान आणि अब्दुल समद यांनाही 1-1 बळी मिळाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे