नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच दोन्ही देशांमध्ये शांतता कायम रहावी, यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, असे आवाहन इराणकडून करण्यात आले आहे. इराणच्या भारतातील राजदूतांनी याबाबत माहिती दिली आहे.
अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी भारताने पुढाकार घेऊन दिलेल्या कोणत्याही प्रस्तावाचे इराण स्वागत करेल, असं इराणचे भारतातील राजदूत अली चेगेनी यांनी म्हटले आहे.
कासिम सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इराणच्या नवी दिल्ली येथील दूतावासामध्ये शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी इराणच्या राजदूतांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी अली चेगेनी म्हणाले, ‘जगात शांतता कायम ठेवण्यासाठी भारताकडून नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली जाते. भारताचा या प्रदेशासोबत संबंधही आहे. दोन्ही देशातील तणाव कमी होण्याच्या दृष्टीने जगातील सर्व देशांकडून विशेषत: भारताकडून एक चांगला मित्र म्हणून देण्यात येणाऱ्या प्रस्तावाचे आम्ही स्वागत करू.’ असे ते म्हणाले.
चेगेनी यांनी सांगितले की, ‘आम्हालाही युद्ध नको आहे. या भागात सर्वांसाठी शांतता प्रस्थापित व्हावी आणि समृद्धी यावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शांतता आणि समृद्धीसाठी भारताकडून उचलण्यात आलेल्या कोणत्याही पावलाचे आम्ही स्वागत करू.’ असेही चेगेनी यांनी म्हटले आहे.