धुळे, २२ फेब्रुवारी २०२३ : शहरानजीकच्या टोलवसुली केंद्राचा ठेका मिळण्यासाठी सात लाखांची लाच घेताना इरकॉन सोमा टोल कंपनीच्या अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणात इरकॉन सोमा टोल कंपनीचे वित्त अधिकारी हरीश सत्तेवली यांनी कंपनीचे संचालक प्रदीप कटियार यांच्या सांगण्यावरून सात लाख रुपयांची रोकड स्वीकारली. सत्तेवली यांना अटक केली असून, कटियार यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.
धुळे येथील रहिवासी असणाऱ्या तक्रारदाराने इरकॉन सोमा टोलच्या अंतर्गत असणाऱ्या चांदवड येथील टोलवसुली केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या दरम्यान केले होते. या कामाच्या मोबदल्याचे बिल प्रलंबित होते. त्याचप्रमाणे या तक्रारदाराने धुळ्यानजीकच्या अवधान शिवारातील टोलवसुली केंद्राच्या ठेक्यासाठी निविदा भरली होती.
सत्तेवली यांनी संचालक प्रदीप कटियार यांच्याशी संपर्क साधून नंतर तक्रारदाराकडे सात लाखांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने धुळे येथील कार्यालयात उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्याकडे तक्रार नोंदविली होती. कटियार यांच्यासाठी पाच लाख आणि स्वतःसाठी दोन लाख अशी सात लाखांची मागणी केली होती. त्यानुसार धुळ्याच्या टोलवसुली केंद्रात पोलिस पथकाने सापळा रचत सत्तेवली यांना सात लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर