IRCTC च्या कमाईत वाढ, तिप्पट नफा

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२२: देशात कोरोनाचे रुग्ण कमी होताच IRCTCची कमाई वाढू लागलीय. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC) चा नफा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वार्षिक आधारावर तिप्पट झालाय. जून तिमाहीत IRCTC चा नफा रु. २४५.५२ कोटी होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत रु. ८२.५ कोटी होता.

त्याचबरोबर कंपनीचे उत्पन्नही पहिल्या तिमाहीत ८५३ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. उत्पन्नातही २५१ टक्के वाढ झालीय. गेल्या वर्षी याच तिमाहीत IRCTC चं उत्पन्न केवळ २४३ कोटी रुपये होतं.

कोणत्या विभागातून कमाई

कंपनीच्या विविध विभागांकडे पाहिल्यास, तिच्या पाचही व्यवसाय विभागांमध्ये वाढ दिसून आलीय. ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत, कंपनीचा केटरिंग सर्व्हिसेसचा महसूल ५७.७ कोटी रुपयांवरून २५२ कोटी रुपयांपर्यंत वाढलाय. त्याच वेळी, इंटरनेट तिकीट व्यवसायाचा महसूल ३०१.६ कोटी रुपयांवर पोहोचलाय.

त्याच वेळी, एप्रिल ते जून या तिमाहीत, IRCTC ने रेल नीर व्यवसायातून ८३.६ कोटी रुपये, पर्यटन व्यवसायातून ८१.९ कोटी रुपये आणि राज्य तीर्थक्षेत्र व्यवसायातून ३३.२ कोटी रुपये कमावले आहेत.

कोरोना थांबला म्हणून व्यवसायात वाढ

कंपनीच्या EBITDA मध्ये सर्वात मोठा वाटा इंटरनेट तिकीट व्यवसायाचा आहे. वार्षिक आधारावर, ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा EBITDA रु. १११.५ कोटींवरून रु. ३२०.९ कोटी झालाय, तर EBITDA मार्जिन ४५.८ टक्क्यांवरून ३७.६ टक्क्यांवर घसरला आहे.

बुधवारी IRCTC चे शेअर्स २ टक्क्यांनी वाढून ६७२.५० रुपयांवर बंद झाले. विशेष म्हणजे, देशात कोरोनाची प्रकरणं कमी झाल्यामुळं रेल्वे प्रवाशांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे. आता याचा फायदा IRCTC ला मिळत आहे. एवढंच नाही तर आगामी काळात कंपनीची वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा