मोदी इज इंडिया, हा इंडियाचा अपमान नाही का? संजय राऊत

मुंबई, १९ जुलै २०२३ : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा सरकारला हरवण्यासाठी देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांची संयुक्त बैठक काल बंगळुरू येथे पार पडली असून आपल्या आघाडीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. देशभरातील २६ पक्ष या बैठकीला हजर होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय देखील झाले आहेत. या बैठकीत २६ पक्षांच्या आघाडीला INDIA असं नाव देण्यात आलं असून Indian National Development Inclusive Alliance असा त्याचा पूर्ण अर्थ होतो. पण आता यावरून भाजपाने टीका केली आहे. हा भारताचा अपमान असल्याचं म्हटलं जातंय. यावरून संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीकास्र सोडलं आहे.

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ वर्षात एनडीए आठवली नाही, मित्र पक्ष आठवले नाही, आपले सहकारी आठवले नाही, पण आम्ही पाटणा आणि बंगळुरूत भेटलो. त्यानंतर मोदी आणि शाह यांना एनडीए आठवली. याबद्दल एनडीएतील सध्याच्या लोकांनी मोदींचा सत्कार केला पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. आम्ही इंडिया म्हणून एकत्र आलो आहोत. मोदींनीच काय व्होट फॉर इंडिया म्हटलं पाहिजे. मोदी म्हणतात, मी इंडिया, मोदी इज इंडिया. हा इंडियाचा अपमान नाही का? त्याचा अर्थ काय होतो? असा सवाल राऊत यांनी केला.

तसेच मोदी म्हणजे इंडिया नाही. भाजपा म्हणजे इंडिया नाही. प्रत्येक व्यक्ती हा इंडिया आहे, असं संजय राऊत म्हणाले. भ्रष्टाचारी लोकांची ही आघाडी असल्याची टीका भाजपाकडून करण्यात येत आहे. यावरून संजय राऊत म्हणाले की, ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा तुमच्या बाजूला उभा आहे. पाठिमागे इक्बाल मिरची उभा आहे. हे ढोंग बंद करा. आता हे ढोंग लोकांना कळत आहे. तुम्ही म्हणजेच इंडिया हे आम्ही मानत नाही. देशातील नागरिक म्हणजे इंडिया आहे. आम्ही २६ पक्ष एकत्र आल्यावर तुमच्या एनडीएचं कमळ फुलायला लागलं. आम्ही भारत देश म्हणून एकत्र आल्यावर तुम्हाला एनडीए आठवली. हा इंडिया तुमच्या हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. भारत जिंकणार इंडिया जिंकणार आणि हुकूमशाहीचा पराभव होणार. हिंमत असेल तर भारताचा पराभव करून दाखवा. भाजप इंडियाच्या विरोधात षडयंत्र करत आहे. दुसऱ्यांकडे बोट दाखवताना चार बोटं तुमच्याकडे आहेत हे लक्षात घ्या.

तसेच पुढे किरीट सोमय्या प्रकरणी संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मी गांधींजीचा भक्त आहे. मी वाईट पाहत नाही. नाही मी वाईट ऐकत. परंतु, वाईटाचा अंत नक्कीच करतो. आमच्यावर संस्कार आहेत. या राज्याची परंपरा आहे. बाळासाहेबांनी सांगितलं आहे की कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका. त्यांना पत्नी आहे, मुलं आहेत. त्यांनी कोणतं पाप केलं असेल तर त्यांना भोगावं लागेल. असंही संजय राऊत म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा