बंगळूरु, २६ ऑगस्ट २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेतल्यानंतर इस्रोने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. भारताची महत्त्वकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान -3 चे सॉफ्ट लँडींग यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसचा दौरा आटोपल्यानंतर थेट बंगळूरु गाठलं. त्यानंतर त्यांनी बंगळूरुमध्ये इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी काही महत्त्वाच्या घोषणा देखील केल्या.
पहिली- यापुढे भारत दरवर्षी २३ ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय अंतराळ दिन (नॅशनल स्पेस डे) म्हणून साजरा केला जाईल
दुसरी- ज्या ठिकाणी लँडर चंद्रावर उतरले, त्या जागेला ‘शिवशक्ती पॉइंट’ असे म्हटले जाईल.
तिसरी- ज्या ठिकाणी चांद्रयान-2 च्या पायाचे ठसे आहेत, त्या ठिकाणाला ‘तिरंगा’ असे म्हटले जाईल.
चांद्रयान ३ मोहिमेअंतर्गत २३ ऑगस्ट रोजी यानाचे चंद्रावर लँडिंग झाले. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण अफ्रिकेला गेले होते. त्यांनी तेथूनच हा उपक्रम दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पाहिला. त्यामुळे भारतात येताच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांची बंगळुरूत येऊन भेट घेतली. तसंच, त्यांना संबोधितही केलं.
४५ मिनिटांच्या भाषणात नरेंद्र मोदी बोलतात की, मी दक्षिण आफ्रिकेत होतो, त्यानंतर ग्रीसमध्ये कार्यक्रमाला गेलो होतो. पण माझे मन पूर्णपणे तुमच्यात गुंतले होते. पण असं वाटतं होत की, मी तुमच्यावर अन्याय करतोय, कारण मला तुमच्यासमोर नतमस्तक व्हायचे होते. मला तुम्हाला भारतात लवकरात लवकर भेटायचं होत. तसेच मला तुम्हाला नमन करायचे होते. तुमच्या मेहनतीला सलाम- तुमच्या संयमाला सलाम- तुमच्या जिद्दीला सलाम तुमच्या चैतन्यला सलाम. तुमच्या आत्म्याला सलाम-चंद्राच्या ज्या भागावर टचडाउन झाले, तो बिंदू आता ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखला जाईल, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी इस्रोचे महिला वैज्ञानिकांचंही विशेष कौतुक केलं. उपस्थित वैज्ञानिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ज्या मनाने आपण कर्तव्य कर्म करतो, विचार आणि विज्ञानाला गती देतो आणि जे सर्वांमध्ये उपस्थित आहे, ते मन शुभ आणि कल्याणकारी संकल्पाशी जोडलेले राहावे. मनाच्या या शुभ संकल्पांशी जोडले राहण्यासाठी शक्तीचा आशिर्वाद अनिवार्य आहे. ही शक्ती आपली नारी शक्ती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट करत इस्रोने आभार मानले आहेत. इस्रोच्या कमांड सेंटरवर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी पंतप्रधान मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या प्रमुखांची पाठ देखील थोपटली. तसेच यावेळी त्यांनी मोहीम फत्ते झाल्याबद्दल पंतप्रधानांनी शुभेच्छा देखील दिल्या आणि शास्रज्ञांसोबत फोटो देखील काढला. पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी देखील संवाद साधला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे