उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे अत्यावश्यक

उस्मानाबाद, दि. २६ जून २०२०: कोरोना महामारीच्या गंभीर वातावरणात उस्मानाबाद जिल्ह्यात उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध होत नसल्याने रूग्णांना सोलापूर अथवा लातूर येथील रूग्णालयात पुढील उपचाराकरिता पाठवावे लागत आहे. तरी या सर्व हालचालींच्या वेळी रूग्णाच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टींकडे पाहता उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे ही एक अत्यावश्यक बाब असल्याने, आ. राणा जगजीतसिंह पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांच्या कडे उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव येणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवा अशी मागणी केली आहे.

उस्मानाबाद जिल्हा हा देशातील आकांक्षीत जिल्ह्यांपैकी एक आहे.केंद्र सरकारने आकांक्षीत जिल्ह्यांच्या विकासासाठी विशेष योजना जाहीर केली असून सदर योजनेत आकांक्षीत जिल्ह्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे . नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरू करणे किती गरजेचे आहे हे आ. पाटील यांनी पत्रातून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना सांगितले. आ.पाटील यांनी पत्राद्वारे ना.देशमुख यांना उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या अनुषंगाने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मानकानुसार १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरीता आवश्यक त्या सर्व प्राथमिक बाबींची पूर्तता करण्यात आली असल्याचे अवगत केले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्राथमिक बाबींची पूर्तता करण्यात आली असून वैद्यकीय महाविद्यालय तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इमारती ही उपलब्ध आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाला या वर्षी मंजूरी मिळाली तर पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया चालू करता येईल. तरी, जिल्ह्याचे संपर्क मंत्री तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री या नात्याने उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव येणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत ठेवण्याबाबत तसेच मंजूर करून घ्यावा आणि तो पुढे केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी आ.राणा जगजीतसिंह पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या कडे केली. तसेच मंत्री अमित देशमुख यांनी या मागणी ला सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या १५ दिवसांत संबंधित विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवणार असल्याचे आश्वासन ही दिले आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा