पारंपरिक पिकांऐवजी जिरेनियमची लागवड ठरतेय उपयुक्त – प्रताप काळे

माढा, दि.९ ऑगस्ट २०२०: गेल्या काही वर्षांपासून नवीन पिढीने शेती कसायला जशी सुरूवात केली तशा त्यांचा शेतीकडे व्यापारी दृष्टीने बघण्याचा कलही वरचेवर वाढला. जमीनीची पत, पाण्याची उपलब्धता, वातावरणातील बदल यानुसार शेतीत नवेनवे प्रयोग करून शाश्वत उत्पन्नाची हमी देणाऱ्या पिकांची निवड करणे गरजेचे वाटू लागले. म्हणूनच माढा तालुक्यातील सुर्लीचे उद्योजक प्रताप काळे यांनी आपल्या करमाळा तालुक्यातील केम येथील १५ एकर शेतात जिरेनियम या सुंगधी वनस्पतीची लागवड केली. त्यातूनच आता तेल निर्मितीकडे वळत शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळविण्याच्या नवीन वाटा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. यातुन त्यांना एकरी २ ते ३ लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील महाळुंगचे तुकाराम वाटेकर यांच्या नंतर दुसरा व करमाळा तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याने अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग मार्गदर्शक ठरणारा आहे.

मोरया उद्योग समुहाच्या या जिरेनियम शेती अंतर्गत सुंगधी तेलाच्या प्रकल्पाचे उद्घाटन १० ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. या वनस्पतींपासून सुगंधी तेल उत्पादित होते. या वनस्पतींचा उपयोग ‘सौंदर्य प्रसाधने’ (कॉस्मॅटिक), अरोमा थेरपी, औषध निर्मितीसाठी केला जात असल्याने उत्पादनास मोठी मागणी आहे.

प्रतिवर्षी भारत देशात या जिरेनियम तेलाची एकदंरीत मागणी २०० ते ३०० टन आहे व भारतात सध्या या तेलाचे साधारणतः १० टन उत्पादन होत असल्याचे दिसून येते. जिरेनियम वनस्पतींपासून एकरी २० ते ३० लिटर तेल मिळते. या तेलाची किंमत प्रतिलिटर १०,००० ते १२,५०० रूपये असल्याने हि जिरेनियम वनस्पतीची लागवड शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया सक्षम बनवणारी असल्याचे प्रताप काळे सांगतात. या प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन मोरया समुहाचे दिलीप काळे, वंदना काळे, विश्वजीत काळे व अभिजित काळे यांनी केले आहे.

नावीन्यपूर्ण प्रयोगांबाबत सकारात्मक: प्रताप काळे 

सोलापूर जिल्ह्यातील दुसऱ्या जिरेनियम या सुंगधी वनस्पतीच्या तेल निर्मिती प्रकल्पाची महाळुंगचे तुकाराम वाटेकर व वाघोलीचे संतोष अवताडे यांच्या सहकार्याने सुरूवात करत आहे. आम्ही १५ एकर मध्ये सध्या जिरेनियमची लागवड केली, असुन आणखी १५ एकर लागवड करण्याचा विचार आहे. नैसर्गिक सुंगधी वनस्पतींच्या शेतीला मोठा वाव असल्याने शेतकऱ्यांनी या नाविन्यपूर्ण शेतीकडे वळायला हवे असे प्रताप काळे सांगतात.

जिरेनियमच्या शेतीसाठी कमीत कमी खर्च

जिरेनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. याची अधिक माहिती ही सरकारच्या सुगंधी औषधी विभागात मिळते. या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते. एका एकरात दहा हजार रोपे लागतात आणी हे पिक एका वर्षात तीन वेळा कापणीला येते. एकरी सुरूवातीला खर्च ७० ते ८० हजार येतो. इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये ७५ टक्के खर्च कमी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा