सोलापुरात लवकरच आयटी पार्क, रोबोटिक्स कंपनी येणार, माजी महापौर महेश कोठे यांची माहिती

69

सोलापूर २५ जून २०२३: सोलापूर सारख्या औद्योगिक शहरात आता केवळ आयटी पार्कच नव्हे, तर रोबोटिक्स कंपनीही येत आहे. त्याची तपशीलवार माहिती लवकरच देणार असल्याचे माजी महापौर महेश कोठे यांनी सांगितले. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून या कंपन्यांशी चर्चा झाली असुन, सोलापूर येथील डोणगाव भागातील जागेत त्याचे लवकरच भूमिपूजन होईल, अशी माहितीही कोठेंनी दिली.

पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर सारखी शहरे आता आैद्योगिकदृष्ट्या ओव्हर-फ्लो झालीयत. येथील जमिनींचे भाव गगनाला भिडले असुन बऱ्याच औद्योगिक कंपन्यांना आता वेगळे ऑप्शन हवे आहे. जिथे वाहतुकीचा ताण नाही, पायाभूत सुविधांचा प्रॉब्लेम नसावा अशी शहरे शोधली जातायत. या परिपुर्ण कॅटेगरी मध्ये कंपन्यांना, आैद्योगिक विस्तारासाठी आता सोलापूर खुणावत आहे. येथे सुरु होत असलेली विमानसेवा, स्मार्ट सिटीचे इन्फ्रास्ट्रक्चर, सुरू असणारी चादर-टॉवेल उत्पादनाची कारखानदारी आणि विशेष म्हणजे सोलापुरातील स्थानिक टॅलेंट. या चांगल्या गोष्टींवर सोलापूर शहर, औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांना आपल्याकडे खेचतय.

सोलापूर आयटी हब व्हावं, यासाठी स्थानिक उद्योगपतींनी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी जोर लावलाय अस चित्र आहे. याच मुख्य कारण येणाऱ्या निवडणूका असल्या तरी, यावेळी मात्र नक्की आयटी पार्क उभं करायचं असा चंगच महेश कोठेंनी बांधलाय असे दिसून येते. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून टीसीएस या जगविख्यात कंपनीने सोलापुरात नुकतीच पाहणी केल्याचे आणि टीसीएसचे एक युनिट सोलापूरला येण्याबाबत उत्सुक असल्याचे कळतेय. तिसरीकडे सोलापूरच्या उद्योग, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या, दमाणी कुटुंबातील राजेश दमाणी यांनीही आयटी कंपनी आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मागेच बोलून दाखवलय.

सर्वांच्या प्रयत्नांतून आयटी कंपन्या आल्या तर सोलापूरचे भविष्य उज्ज्वलच आहे. पण यात बाजी, माजी महापौर महेश कोठे मारणार अस दिसतंय. डोणगाव रस्त्यावर कोठे यांची स्वत:ची जमीन आहे. तिथे आयटी पार्क आणण्याबाबत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. एका मोठ्या ग्रुप ऑफ कंपनी सोबत तसेच आयटी क्षेत्रातील तज्ञांसमवेत त्यांची पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठकही झालीय. आमदार रोहित पवारांमुळे या कामाला आता गती मिळाली असुन लवकरच आम्ही महाराष्ट्राचा एक मोठा ब्रँड असणाऱ्या कंपनी सोबत आयटी-पार्कचे काम सुरू करु, असे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलताना कोठेंनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.