नवी दिल्ली: जर भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थिती कायम राहिली तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या या वर्षात आपल्या ३० ते ४० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करु शकतात, अशी भीती इन्फोसिसचे माजी चीफ फायनान्शिअल ऑफिसर मोहनदास पै यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत एक हिंदी वृत्तपत्राने माहिती दिली आहे.
आज आयटी क्षेत्रात प्रत्येक पाच वर्षांनंतर हजारो लोकांच्या नोकऱ्या या प्रकारे जातात. कारण, पाच वर्षांत आयटी क्षेत्रात मोठे बदल होत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांतून काढले जाते, असे पै यांनी म्हटले आहे. जेव्हा कोणतीही इंडस्ट्री पूर्ण सक्षम होते तेव्हा मध्यम स्तरावर काम करणारे अनेक लोक आपल्या पगाराच्या तुलनेत कंपनीला नवं काही देऊ शकत नाहीत.
या कारणामुळे जगात प्रत्येक क्षेत्रात अनेक जणांना आपली नोकरी गमवावी लागते, असे त्यांनी म्हटले आहे.
पै म्हणाले की, आयटी क्षेत्रात होत असलेल्या बदलांमुळे प्रत्येक पाच वर्षांनी ही स्थिती येत असते. जर कोणाला अधिक पगार मिळत असेल तर त्याला त्या हिशोबाने काम करावे लागते. जर तो याबाबत पिछाडीवर राहिला तर त्याला आपली नोकरी गमवावी लागते. असे असले तरी आयटी क्षेत्रातील ज्या लोकांची नोकरी जाईल. त्यांच्याकडे दुसऱ्या संधी देखील उपलब्ध असतात. मात्र, त्यासाठी त्यांना काळाप्रमाणे अपडेट रहावे लागते.