फलटण, १९ जानेवारी २०२३:फलटण तालुका माझ्यासाठी राजकीय होमपीच असून,या तालुक्यातूनच मला राज्यातील राजकारणात संधी मिळाली आणि या संधीमुळेच पाण्याचे, औद्योगीक वसाहत, पुनर्वसनाच काम पूर्ण झाले. यासोबतच महत्वपूर्ण असे सभापती पद मिळाले आणि त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला. सत्तेची कितीही पदे अथवा सन्मान मिळो, परंतू जनतेच्या ह्रदयात आपले काम पोहचल्याचा आनंद अधिक आहे. अन तो आनंद गावकर्यांनी मला दिला आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
तरडगाव ता फलटण येथे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, माजी सभापती वसंतराव गायकवाड, बाळासाहेब सोळस्कर विश्वजीत राजे नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, प्रत्येकाला धर्म, जात असते. मात्र मोबाईलवर यावरून निघालेले वेगळे ग्रुप समाजाचे विघटन करीत आहेत. सत्तेच्या लोभापायी धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न चालला आहे की काय ? यातून आपल्या जिल्ह्याला वाचविण्यासाठी चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. यासाठी ज्येष्ठांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, रामराजे यांना राजकारणात पदे मिळाली. सत्तेचा उपयोग त्यांनी समाजाची सेवा करण्यासाठी केला. विधान परिषदेच्या सभागृहात क्वचितच एखाद्या वेळेस गोंधळ होवून कामकाज बंद पडले असेल. नाही तर त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी कामकाजावर कंट्रोल ठेवून उत्तम सभापती होण्याचा मान मिळविला आहे.
- वृक्षारोपण व पदाधिकाऱ्यांचा सत्कार
कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी तळावर वृक्षारोपण करण्यात आले. तसेच तरडगाव सोसायटीच्या तिसऱ्या मजल्याचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच कार्यक्रमादरम्यान, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणूकीत विजयी झालेल्या गावच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार