मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत मस्ती बेतली जीवावर, जलतरण तलावात बुडून ‘आयटी’तील तरुणाचा मृत्यू

4

पुणे, ५ जानेवारी २०२३ : मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. तीन) घडली. जुना खंडाळा घाटात असलेल्या एका सोसायटीच्या बंगल्यात हा प्रकार घडला. लोणावळा पोलिस ठाण्यात याप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निखिल निकम असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोणावळा परिसरात अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती अशी, की वाढदिवस साजरा करण्यासाठी जुना खंडाळा घाटातील एका बंगल्यात निखिल हा त्याच्या मित्रांसोबत आला होता. वाढदिवस साजरा करताना तो मित्रांसोबत दारू प्यायला होता. दारूच्या नशेत तो जलतरण तलावाशेजारी गेला आणि तोल जाऊन तो जलतरण तलावामध्ये पडला. त्याला पोहता येत नसल्याने जलतरण तलावात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

निखिल निकम हा पिंपरी-चिंचवड येथील थेरगाव येथील राहणारा होता. तो उच्चशिक्षित असून, आयटी कंपनीत काम करीत होता. मित्रांसोबत तो लोणावळ्यात पार्टीसाठी आला होता; मात्र दारू प्यायल्यामुळे तोल गेला आणि जलतरण तलावामध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले; पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी विशाल नानासाहेब निकम (वय ३२, शिवराम हाईट, विष्णुदेवनगर, पुनावळे) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे लोणावळा परिसरात एकच खळबळ उडाली होती. वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले सर्व मित्र पिंपरी-चिंचवड परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा