जम्मू-काश्मीर, १६ ऑगस्ट २०२२: जम्मू-काश्मीरमधील चंदनवाडी येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. येथे अमरनाथ यात्रेच्या ड्युटीमध्ये व्यस्त असलेल्या ITBP जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला. या अपघातात ६ जवान शहीद झाले. तर अनेक जवान जखमी झाले आहेत. त्यांना एअरलिफ्ट करून श्रीनगर आर्मी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे.
आयटीबीपी जवानांना घेऊन जाणारी बस चंदनवाडीहून पहलगामला जात होती. त्यानंतर बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात पडली. या बसमध्ये ३९ सैनिक होते. त्यापैकी ३७ जवान ITBP चे होते, तर २ जम्मू-काश्मीर पोलिसांचे होते.
पहलगामपासून चंदनवाडी १६ किमी अंतरावर आहे. नुकतीच अमरनाथ यात्रा संपली. अशा परिस्थितीत या यात्रेत तैनात सुरक्षा दलाचे जवान आपापल्या तुकड्यांमध्ये परतत आहेत. हे जवानही कर्तव्य बजावून परतत होते, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ब्रेक फेल झाल्याने बस खड्ड्यात पडली. बस खाली नदीच्या काठावर असलेल्या खड्ड्यात पडली आहे. यात ६ जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी जवानांना विमानाने श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात झालेल्या बसच्या मागे आयटीबीपीची आणखी एक बस असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात कमांडो होते. समोरच्या बसला अपघात होताच दुसऱ्या बसमध्ये बसलेले कमांडो खाली उतरले आणि त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे