‘वैदिक संस्कार’ आणि ‘सायबर सुरक्षा’ सोबतच ड्रोन तंत्रज्ञान शिकण्याची सुवर्णसंधी
सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) केवळ आता फिटर, वेल्डर यांसारखे पारंपरिक अभ्यासक्रम शिकवणार नाहीत! राज्य सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, आयटीआयमधील तरुण आता पौरोहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे घेणार आहेत. ‘कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता’ विभागातर्फे ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या उपक्रमाद्वारे ही क्रांती घडत आहे.
या उपक्रमातील सर्वात आकर्षक आणि लक्ष वेधून घेणारा विषय म्हणजे नाशिक येथील आयटीआयमध्ये सुरू झालेला ‘वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट’ हा नवा अभ्यासक्रम! आगामी नाशिक कुंभमेळ्यामध्ये विधींसाठी प्रशिक्षित पुरोहित उपलब्ध व्हावेत, या हेतूने हा तीन ते सहा महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. आयटीआयमधील तरुण आता वैदिक संस्कारांचे प्रशिक्षण घेऊन पौरोहित्याच्या क्षेत्रात नवी ओळख निर्माण करणार आहेत.
केवळ धार्मिकच नाही, तर आधुनिक युगाची गरज ओळखून सायबर सुरक्षा, ड्रोन तंत्रज्ञान, आणि कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) यांसारख्या उच्च-तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत. स्थानिक उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने हे रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जात आहे.
या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश‘ या तत्त्वावर असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी प्रवेशाचे निकष लवकरच जाहीर होतील. नोंदणीसाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या! आयटीआयमध्ये आता कौशल्य, रोजगार आणि परंपरेचा त्रिवेणी संगम साधला जात आहे, ज्यामुळे तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील यात शंका नाही!
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































