पुणे महानगरपालिका आयुक्त मा. नवलकिशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने एक महत्त्वाचा आरोग्य उपक्रम राबविण्यात आला. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमात सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) प्रशिक्षण तसेच AED (ऑटोमॅटिक एक्सटर्नल डेफिब्रिलेटर) मशीनचे उद्घाटन यशस्वीरीत्या पार पडले.
या उपक्रमाला रिव्हीव्ह हार्ट फाउंडेशनचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. किंजल गोयल, हृदयरोगतज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, रोटरी क्लब लक्ष्मी रोडचे सदानंद भागवत व दीपा भागवत तसेच पुणे महानगरपालिकेचे विविध विभागातील मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष सीपीआर प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. जगदीश हिरेमठ यांनी हृदयविकाराच्या तात्काळ उपचारासाठी सीपीआर कसे प्रभावी ठरते आणि त्याचा योग्य वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. सहभागी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सराव करून सीपीआरची तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली, ज्यामुळे आपत्कालीन प्रसंगी त्वरित व प्रभावी प्रतिसाद देणे शक्य होईल.
त्याच दिवशी मनपाच्या आरोग्य विभागाच्या तिसऱ्या मजल्यावर अत्याधुनिक AED मशीनचे उद्घाटन करण्यात आले. हे उपकरण हृदयविकाराच्या झटक्यावेळी विद्युत शॉक देऊन रुग्णाचा जीव वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. उद्घाटनावेळी AED चा योग्य वापर, त्याचे फायदे व आवश्यक सुरक्षा खबरदाऱ्या याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले.
हा उपक्रम पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग, रिव्हीव्ह हार्ट फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ लक्ष्मी रोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य विभागाच्या मते, या प्रशिक्षणामुळे आपत्कालीन प्रतिसाद क्षमतेत वाढ झाली असून भविष्यात अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी दिनेश वढणे













































