सातारा, ११ नोव्हेंबर २०२२ : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी २०२४ च्या आत छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणणार असल्याचं जाहीर केल्यानंतर, आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणलीच पाहिजे असं वक्तव्य केलंय.
साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत वक्तव्य केलं. त्याचबरोबर प्रतापगडावरील अफझल खानाच्या अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईवरही उदयनराजे भोसले यांनी आपलं मत मांडलं. तसेच या गोष्टीचं राजकारण करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हंटलंय.
यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले महाराष्ट्रातील प्रत्येकाला वाटतं की जगदंबा तलवार राज्यात आणली जावी. टॉवर ऑफ लंडनमध्ये सध्या ती ठेवलीय.
तेथील सिक्युरीटी मी जाऊन जातीने बघितली आहे. आता डिप्लोमसी म्हणून मोठ्या मनानं बिट्रिश सरकारने ज्या त्या देशाला त्यांच्या त्यांच्या ऐतिहासिक ठेवा दिला पाहिजे.
अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पडले याविषयीही बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात मान सन्मानाच्या बाबतीत कधीच कुणाला कमी केले नाही. आपल्यावर हल्ला करणाऱ्याची कबर बांधण्याचा विचार दुसऱ्या कुणीही केला नसता. परंतु महाराजांचे विचार मोठे होते. जो विचार कुणीच केला नसता, तो छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला असेही उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर