जयदेव बाळासाहेब ठाकरे..शिंदे गटात, उद्धव ठाकरेंना धक्का

9

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२२: नाव जयदेव बाळासाहेब ठाकरे… खरं तर असं म्हणतात की नावात काय आहे… पण इथे नावातच सगळी जादू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात ज्येष्ठ पुत्र जयदेव बाळासाहेब ठाकरे. उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून खरं तर शिवसेनाप्रमुख होण्याचा मान जयदेव ठाकरे यांना होता. पण इतर घराण्याप्रमाणे त्यांनाही डावलण्यात आलं आणि अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर जयदेव ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हाच खरा दसऱ्याचा उद्धव ठाकरेंना धक्का होय. आपलाच मोठा भाऊ आपल्याला दगा देतो, यासारखं दुर्देव नाही. पण आता ही वस्तुस्थिती उद्धव ठाकरेंना स्वीकारावी लागेल.

उद्धव ठाकरे आणि शिंदे गट असे दोन गट पडले असताना आता जयदेव ठाकरे यांचा शिंदे गटातला प्रवेश नक्कीच उद्धव ठाकरेंना डोकेदुखी होऊ शकतो. यासाठी आता उद्धव ठाकरेंनी पाऊल उचलणं गरजेचं आहे.

भाऊबंदकी हा कायम मोठ्या घराण्यांना शाप आहे. त्यामुळे भाऊबंदकीतून हा निर्णय झाला का… असा समज जनतेचा होऊ शकतो. पण ही नक्की खेळी कोणाची? एकनाथ शिंदेंची की देवेंद्र फडणवीसांची हे मात्र ओळखणे गरजेचे आहे. त्यामुळे जयदेव ठाकरे आणि निहार ठाकरे यांना शिवसेनेतून डावलणं आणि त्यांचा शिंदे गटात प्रवेश यातून आता एकच स्पष्टीकरण मिळू शकतं की, उद्धव ठाकरे यांची बाजू कमकुवत झाली आहे.

असं म्हणतात घर का भेदी लंका ढाए, तसं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झालंय. पण शिंदे गटातल्या जयदेव ठाकरेंच्या प्रवेशाने शिंदे गटाला भक्कम आधार मिळालाय. आता पुढच्या भाषणात जयदेव ठाकरे काय बोलणार? आणि त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार? हे चित्र नक्कीच आश्चर्यकारक असेल यात शंका नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस