हैदराबाद: देशभर गाजत असलेल्या हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासात एक खळबळजनक माहिती पुढे आली आहे. २७ नोव्हेंबरला ही घटना घडली होती.
डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिचा मृतदेह जाळून पसार झालेले नराधम घटनास्थळी परत आले होते. मृतदेह पूर्णपणे जळाला की नाही याची खातरजमा करण्यासाठी चौघांनीही पुन्हा त्या ठिकाणी येण्याची हिंमत केली होती. इतकंच नव्हे तर मद्यधुंद अवस्थेतील या चौघांनी पीडितेलाही दारू पाजण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींनी पीडितेची मदत करण्याच्या बहाण्याने तिला गाठलं आणि तिच्यावर बलात्कार केला. ते तिची बाइक घेऊन गॅरेजमध्ये गेले होते.
तपासात ही बाब समोर आली की दोन आरोपी, शिवा आणि नवीन यांनी आधी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर शमशाबाद आणि शादनगरच्या दरम्यान आधी संपूर्ण रस्त्याची रेकी केली. नंतर चट्टनपल्ली गावातील एका अंडरपासच्या खाली त्यांनी मृतदेह जाळला. हे दोघे पीडितेच्याच बाइकने पुढे जात होते तर बाकीचे दोन आरोपी मृतदेहासोबत ट्रकमध्ये होते. शिवा आणि नवीनने आधी दुसऱ्या दोन-तीन जागादेखील शोधल्या होत्या, पण तिथे लोक होते त्यामुळे हे तिथे थांबले नाहीत. हायवेवर जेव्हा अंडरपास दिसला, तेव्हा ती जागा निर्जन असल्याचे ताडून चौघांनी मृतदेह जाळला. यानंतर ते तिथून पसार झाले आणि मृतदेह पूर्णपणे जळला की नाही याची खातरजमा करण्यासाठी काही वेळाने पुन्हा त्या ठिकाणी आले