जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वापरले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कंत्राटी वाहन, आरटीओने कारवाई करताच जुन्या वाहनातून प्रवास

जळगाव ८ डिसेंबर २०२३ : आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारताच त्यांच्यासाठी असलेले जुने वाहन सोडून नव्या वाहनातून प्रवास करणे सुरू केले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कंत्राटी वाहन जिल्हाधिकारी वापरत असल्याची तक्रार आरटीओकडे आल्याने त्यांनी या वाहनास दंड केला. या दंडात्मक कारवाईनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हे नवे वाहन सोडून जुन्या वाहनाने प्रवास करण्यास सुरवात केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या सेवेत एमएच १९ एम ०१०१ हे वाहन गेल्या तीन चार वर्षापासून दिले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची प्रशासकीय बदली करण्यात आल्याने त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर लागलीच त्यांनी त्यांच्या सेवेत असलेले प्रशासकीय वाहन बदलले अन्य अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्था देखील नव्याने केली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अगोदर तत्कालीन जिल्हाधिकारी मित्तल यांच्या कार्यकाळात अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. परंतु, अनेक अधिकारी रुजू झाले नाही. काही अधिकारी हे दोन ते तीन महिने अंतराने बदली रद्द झाली नाही म्हणून रुजू झाले.

दरम्यान जिल्हाधिकारी प्रसाद यांनी त्यांची बैठक व्यवस्था देखील नवीन पद्धतीने वास्तुशास्त्रानुसार केली असावी, असे बोलले जात आहे. यासोबतच त्यांचे प्रशासकीय वाहन देखील त्यांनी बदलले. याची वाच्यता सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केली. यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत असलेले वाहन कंत्राटी पद्धतीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या दिमतीला असल्याचे समोर आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून या वाहनाची नोंदणी अन्यत्र असल्याची माहिती या सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली तसेच हे वाहन कोणत्या अधिकारांतर्गत आले याबाबत बरीच चर्चा झाली.

आता तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या सेवेत असलेले प्रशासकीय वाहन क्र.१९ एम ०१०१ आज जिल्हाधिकारी आवारात पुन्हा दिमतीला हजर झाले असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या संदर्भांत संबंधितांना उप प्रादेशिक परिवहन विभागातर्फे १० हजार रुपयांचा दंड आज गुरुवारी आकरण्यात आला. तसेच टॅक्सचे २ हजार २४४ रुपयांचा दंड आकारण्यात आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : डॉ.पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा