जळगाव, १७ फेब्रुवारी २०२४ : जळगाव महापालिकेचा सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांचे ९७२ कोटी २७ लक्ष रुपयांचे मुळ अंदाजपत्रक आयुक्तांनी सादर केले असून या अंदाजपत्रकास प्रशासक म्हणून डॉ. विदया गायकवाड यांनी मंजुरी दिली. २८ कोटी ४४ लक्ष शिल्लकीचा हा अर्थसंकल्प असून यात कर वाढ नसल्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. तसेच सन २०२३-२४ चा सुधारीत ९०० कोटी १० लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकाला देखील यावेळी मंजुरी देण्यात आली आहे.
सन २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक १६८ कोटी २२ लक्ष असून महसुली जमा ३६७ कोटी ८२ लक्ष आहे. तसेच भांडवली जमा ३०५ कोटी ७३ लक्ष असून असाधारण देवाण-घेवाण ७६ कोटी ४ लक्ष आहे तर, परिवहन विभागाचे ५० लक्ष, पाणी पुरवठा विभागाचे ३६ कोटी १६ लक्ष व मलनिस्सारणातून १७ कोटी ८० लक्ष अशी एकुण जमा बाजू ९७२ कोटी २७ लक्ष रुपयांची आहे.
सन २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात महसुली खर्च ४२६ कोटी ४४ लक्ष, भांडवली खर्च ३७३ कोटी ६५ लक्ष, असाधारण देवाण-घेवाण ८९ कोटी २८ लक्ष परिवहन विभागावर ५ लक्ष, पाणी पुरवठा ४६ कोटी १७ लक्ष, मलनिस्सारण ७ कोटी ७९ असा खर्च होणार असून अखेरची शिल्लक २८ कोटी ४४ लक्ष रुपयांची राहणार असल्याचे अंदाजपत्रकात नमुद करण्यात आले आहे.
सन २०२३-२४ चा १ हजार २६ कोटी ९० लक्ष रुपयांचे मुळ अंदाज पत्रक सादर करण्यात आले होते. यात दुरुस्ती करून ९०० कोटी १० लक्ष रुपयांचे सुधारीत अंदाजपत्रकाला देखील गुरुवारी प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी मंजुरी दिली. १६८ कोटी २२ लक्ष शिल्लकीचे हे अंदाजपत्रक आहे. सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा सुधारीत अर्थसंकल्प तयार करतांना उत्पन्नाच्या अतिशय सुक्ष्म बाबींचा विचार करून प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून जमे मध्ये कोणतीही अवाजवी वाढ न करता तसेच विभागांचा कामनिहाय आढावा, प्रलंबीत दायित्व व नव्याने प्राप्त प्रस्ताव व मंजुरी यांचा सविस्तर विचार करून उत्पन्न व खर्चाचा अंदाज करण्यात आलेला आहे.
सन २०२४-२०२५ या आगामी आर्थिक वर्षात जळगाव शहरातील सौदर्याकरण, शहरातील वाहतूक व्यवस्था याकरीता शहरात आवश्यक त्या ठिकाणी नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करणे, शहरातील वाढीव हद्दीत दिवाबत्ती व्यवस्था कार्यान्वीत करणे, पर्यावरणाचे दृष्टिकोनातून प्रदुषण कमी करणे, नागरीकांसाठी ट्रि बँक सारखे उपक्रम राबविणे, घनकचरा व्यवस्थापन व मलनि:स्सारण यासारख्या योजना सुरळीत करणे तसेच अमृत योजने अंतर्गत शहरातील पाणीपुरवठा २४ x ७ सुरळीत करणे इत्यादी नागरीकांसाठी सुविधा देणेच्या दृष्टीकोनातून प्रशासन प्रयत्नशील आहे. सर्व तक्रारी ऑनलाईन नोंदवीणे व त्यांचे तातडीने निराकरण करणे तसेच डिजिटायझेशनच्या माध्यमातून सेवांची माहिती नागरीकांना देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
जिल्हा नियोजन समितीचे माध्यमातुन नागरी दलितेत्तर वस्ती, सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान व नागरी दलित वस्ती सुधारणा या योजनांमधील सन २०२३-२०२४ मधील मंजुर झालेली निधींमधील कामे सन २०२४-२०२५ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच शासकीय योजनांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीच्या अनुषंगाने अनुज्ञेय महानगरपालिका हिस्स्यासाठी देखील स्वतंत्र एकत्रित तरतुद अंदाजपत्रकात करण्यात आलेली आहे.
मागील आर्थिक वर्षात शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले असून ज्या मालमत्तांचे सर्वेक्षण करणे बाकी आहे अशा सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार असलेले सक्तीच्या वसुलीबाबतचे सर्व अधिकार वापरुन मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे. यापुढेही सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षामध्ये करवसुलीचे प्रमाण वाढवण्याबाबत सर्व प्रभाग अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या असून वसुली उद्दीष्ट पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. तसेच मनपा मालकीच्या खुल्या भुखंडांबाबत (Open Space) सर्वेक्षण करून आवश्यक ती पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्याचा मनपाचा मानस आहे.
पाणीपुरवठा करापासून सन २०२३-२४ या वर्षासाठी रक्कम रु.२८.७६ कोटी इतके सुधारीत उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून सन २०२४-२५ या वर्षामध्ये रक्कम रु.३२.९१ कोटी इतके उत्पन्न अपेक्षित आहे. नजीकच्या काळात सध्या सुरू असलेले अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होणार आहे. जुन्या पाणीपुरवठा वाहीन्यांवरील नळ जोडणी नवीन पाईपलाईन वर जोडून देण्यात येत आहे. जी नळ जोडणी अधिकृत आहेत असेच नळ जोडणी नविन पाईप लाईनवर जोडून देण्यात येत असल्यामुळे अनधिकृत नळ कनेक्शन बंद होणार आहे. त्यामुळे यापासून होणारे मनपाचे नुकसान टळणार आहे.
अनधिकृत नळ जोडणी असणाऱ्यांना महानगरपालिकेकडे रितसर मागणी करून नवीन नळ जोडणी देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे अधिकृत कनेक्शनची संख्या वाढून पाणीपट्टी पासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.
अमृत २.० मध्ये प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी प्रस्तावित असून यात १००% ग्राहक मिटर जोडणी व SCADA ऑटोमेशनचा समावेश आहे. मान्यतेनंतर सत्वर पुढील कार्यवाही करून काम हाती घेण्यात येणार आहे. शहरातील जुन्या तांत्रीक प्रणालीचे १५,४५७ पथदिवे निष्कासीत करून त्याजागी ई ई एस एल एजन्सी मार्फत एस्को तत्वावर एल.ई.डी. दिवे बसविण्याचा उपक्रम राबविण्यात येऊन १७७५२ एल ई डी पथदिवे बसविण्यात आलेले आहेत. सदर पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती करणे कामी सन २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात रु. एक कोटी मात्रची तरतुद करण्यात आलेली आहे. उपक्रम राबविल्याने ५०% विज बचत होणार असून महापालिकेचा विज देयक वरील खर्च देखील कमी होणार आहे. तसेच शहराच्या नविन वाढीव परीसरात सुध्दा एलईडी पथदिवे/ दिवाबत्ती बसविण्याचे कामकाज सत्वर करणेसाठी प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. त्यासाठी सन २०२४-२५ चे मुळ अंदाजपत्रकात रू. एक कोटीची तरतुद करण्यात आलेली आहे.
शहरातील चौकात जुने वाहतूक नियंत्रण व्यवस्था निष्कासीत करून त्याजागी सौरउर्जेवरील नविन तांत्रीक प्रणालीचे टायमरसह स्वयंचलीत वाहतुक नियंत्रण व्यवस्थेचे काम प्रस्तावित असून त्याकामी सन २०२४-२५ चे अंदाजपत्रकात ५० लक्ष मात्रची तरतुद करण्यात आलेली आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातुन ५० ई-बसेस मिळणार असून त्याकरीता रु.९.७२ कोटीचा (इलेक्ट्रीक व बांधकाम) प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला असुन तसेच रु. ६ कोटीचा बांधकाम प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे तो लवकरच मंजूर होऊन ई-बस सेवा (मनपा सिटी बस सेवा) पुढील आर्थिक वर्षात सुरू करण्याचा मानस आहे. परिवहन विभागासाठी प्रशासकीय खर्चाची तरतूद देखील सन २०२४-२५ चे अंदाजपत्रकात रु.५० लक्षची तरतूद करण्यात आलेली आहे.
दिव्यांग कल्याण निधी : दिव्यांग कल्याण योजनांसाठी रु. २ कोटी इतकी तरतुद करण्यात आलेली आहे. मा. महासभेने मान्यता प्रदान केलेल्या महिला व बालकल्याण विभागाच्या २३ योजनांची व दिव्यांग कल्याणासाठीच्या १७ योजनांची महानगरपालिकेमार्फत सन २०२४-२५ मध्ये देखील अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : पंकज पाटील