जालना महासंस्कृती महोत्सवाचा उत्साहात समारोप

जालना, २१ फेब्रुवारी २०२४ : जालना महासंस्कृती महोत्सवाचा शनिवारी रात्री उत्साहात समारोप झाला. यावेळी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री अलका कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे प्रेक्षक आनंदले. तर प्रसिद्ध गायिका साधना सरगम, वैशाली माडे, गायक प्रा. राजेश सरकटे, रवींद्र खोमने, मुनव्वर अली, कुणाल यांनी गायलेल्या राष्ट्रभक्तीपर गीत गायनाने प्रेक्षकांत जोशपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रसिद्ध कोरिओग्राफर संतोष भांगरे यांच्या ग्रुपने विशेषत: लहान मुलांनी केलेल्या नृत्यामुळे प्रेक्षक अचंबित झाले.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर पाच दिवसीय जालना महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी या महोत्सवाचा थाटात समारोप झाला. यावेळी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार आदिंसह मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

महासंस्कृती महोत्सवाचा समारोप “वंदे मातरम्” या राष्ट्रभक्तीपर गीते, भिमगीते, शिवगीते व नृत्यांच्या जोशपूर्ण कार्यक्रमाने झाला. यावेळी साधना सरगम यांनी गायलेल्या ‘हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा, हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा, हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा, हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा’ या गीताने प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले. वैशाली माडे यांनी गायलेल्या वंदे मातरम, ए वतन मेरे वतन आबाद रहे तू, मोठे मोठे ते सरदार असे किती केले ठार जेव्हा निघाली मर्दानी शिवरायांची तलवार व भीमराज कि बेटी हूं या गीतांनी प्रेक्षक भारावले. प्रा. राजेश सरकटे व साधना सरगम या दोघांनी गायलेल्या ‘दिल दिया है जा भी देंगे, ये वतन तेरे लिए’ या गीताने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तराळले. रवींद्र खोमने व मुनव्वर अली यांनी ‘ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों हे गीत अप्रतिम पद्धतीने सादर केले. ये देश है वीर जवानों का, सुनो गोरसे दुनियावालो, तेरी मिट्टी में मिल जावां, गुल बनके मैं खिल जावां या गीतांनी प्रेक्षकांत देशभक्तीपर वातावरण निर्माण केले. काही प्रेक्षकांनी तर उत्स्फूर्तपणे नृत्यही केले. तर कोरिओग्राफर संतोष भांगरे यांच्या ग्रुपमधील मुलांनी रामायणावर सुंदर नृत्य सादर केले. तसेच मुलांनी ‘मैं लड़ जाना, मैं लड़ जाना है, लहू में इक चिंगारी ज़िद से जुनूँ तक है जाना हर कतरा बोल रहा’ या गीतावर सादर केलेल्या जोशपूर्ण नृत्यामुळे प्रेक्षकाच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. अभिनेत्री अलका कुबल यांच्या व्यासपीठावरील आगमनाने प्रेक्षकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी माहेरची साडी या चित्रपटातील गायलेल्या ‘नेसली माहेरची साडी’ या गीताने प्रेक्षकांचे डोळे पाणावले.

सर्व कलावंतांचा यावेळी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड व डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आरजे प्रेषित यांच्या खुमासदार सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम बहारदार झाला. समारोप कार्यक्रमास प्रेक्षकांची मोठी गर्दी होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा