इंग्लंड, २६ ऑगस्ट २०२०: इंग्लंडचा ३८ वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पावसाने बाधित साऊथॅम्प्टन कसोटीच्या पाचव्या दिवशी इतिहास रचला. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तिसर्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात मंगळवारी आपल्या कसोटी कारकीर्दीतील ६०० बळी पूर्ण केले. यासह, कसोटी इतिहासातील ६०० बळी पूर्ण करणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला.
अँडरसनचा ६०० वा बळी पाकिस्तानचा फलंदाज अझर अली बनला. १५६ व्या कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली. अँडरसनने कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी ५९३ बळी घेतले होते. त्याने पहिल्या कसोटीत ५६ धावा देऊन ५ विकेट घेत आपल्या कसोटी विकेटची संख्या ५९८ पर्यंत नेली.
खेळाच्या चौथ्या दिवशी, त्याने पाकिस्तानच्या एका डावात एका विकेटसह ५९९ वा बळी टिपला . अखेर मंगळवारी त्याने आणखी एका विकेटने ६०० च्या जादूई आकडेवारीला स्पर्श केला. अँडरसनने २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध लॉर्ड्स येथे कसोटी सामन्यात प्रवेश केला होता.
मुथय्या मुरलीधरन (८००), शेन वॉर्न (७०८) आणि अनिल कुंबळे (६१९) या तीन फिरकी गोलंदाजांनी अँडरसनपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. एकूण यादीमध्ये अँडरसन चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर १२४ कसोटी सामन्यात ५६३ बळी घेणारा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राचा क्रमांक लागतो.
कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट
१. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका १९९२-२०१०): १३३ कसोटी – ८०० विकेट
२. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया १९९२-२००७): १४५ कसोटी – ७०८ विकेट
३. अनिल कुंबळे (भारत १९९०-२००८): १३२ कसोटी – ६१९ विकेट
४. जेम्स अँडरसन (इंग्लंड २००३-२०२०): १५६ * कसोटी – ६०० * विकेट्स
न्यूज अनकट प्रतिनिधी