जम्मू-काश्मीर, २२ जानेवारी २०२३ : जम्मूतील हिरानगर येथील परशुराम मंदिराजवळ सकाळी सात वाजता राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सुरवात झाली. या यात्रेने ४५ मिनिटांत आठ किलोमीटरचे अंतर कापून लौंडी मोर येथून सांबा जिल्ह्यात प्रवेश केला. भारत जोडो यात्रेचे प्रभारी महासचिव जयराम रमेश म्हणाले, की राहुल गांधींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सुरक्षा यंत्रणा जे म्हणेल त्याचे आम्ही काटेकोर पालन करू.
आज राहुल गांधी यांनी यात्रेतील स्थानिक विद्यार्थिनींची भेट घेतली आणि चर्चा केली. दोन्ही विद्यार्थिनींनी राहुल गांधींकडून काश्मीरबद्दल जाणून घेतले. आज सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या यात्रेत राहुल गांधींसोबत जयराम रमेश आणि दिग्विजय सिंह देखील उपस्थित होते. या दोघांनीही हिरानगर वळणावर जम्मू-काश्मीरचे माजी खासदार गिरधारीलाल डोगरा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. डोग्रा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच भाजप सरकारमधील माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे सासरे आहेत.
राहुल यांच्या जम्मू दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काश्मीरमध्ये प्रवेश करताच निदर्शने सुरू झाली. शुक्रवारी स्थानिक तरुणांनी लाल चौकात राहुल गांधी गो बॅकच्या घोषणा देत यात्रेला विरोध केला. यात्रेवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्याचवेळी यात्रेचा समारोप समारंभ ता. ३० जानेवारी रोजी श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड