जम्मू: जम्मू काश्मीरमध्ये मागील ४८ तासांपासून प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. कुपवाडा मधील माछिल सेक्टरमध्ये हिमस्खलन झाले असल्याने या दुर्घटनेत लष्कराचे ५ जवान हे दबले गेले असून ४ जवान शहीद हे शहीद झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच एक जवान हा अद्याप बेपत्ता आहे. एलओसीजवळ कुपवाडाच्या मच्छल सेक्टरमध्ये हिमवादळ आल्याची माहिती मिळाली आहे. अजूनही काही जवान हे बंकरमध्ये अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जम्मू काश्मीरमधील अनेक भागात मागील काही दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. तसेच श्रीनगरमध्ये देखील बर्फवृष्टी मुळे लोकांच्या अडचणी या वाढल्या आहेत. बर्फवृष्टी आणि सतत चालणाऱ्या पावसामुळे तेथील दळणवळण देखील विस्कळीत झाले आहे. तसेच बर्फवृष्टी मुळे सगळीकडेच बर्फाची चादर पसरली आहे. तर श्रीनगर मध्ये ६ इंचापर्यंत जाडीचा थर तयार झाला आहे. पाऊस आणि बर्फवृष्टी मुळे जम्मू काश्मीरमधील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
श्रीनगर मधील तापमान तर शून्य डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. तसेच बर्फवृष्टीमुळे श्रीनगर मधून ये जा करणाऱ्या अनेक विमानांची उड्डाणे ही रद्द करण्यात आली आहेत. तसेच हवामान विभागाच्या माहितीनुसार श्रीनगरमध्ये आजही बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.