जाणून घ्या एचएएल तेजस विषयी

OLYMPUS DIGITAL CAMERA

बंगळूरु येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) कडे १९८३ साली एलसीएच्या रचनेची जबाबदारी सोपवण्यात आली. इ.स. १९७०च्या दशकापासून भारतीय वायु सेना रशियन बनावटीच्या मिग २१ व मिग २३ अवलंबून होती. इ.स. १९९०च्या दशकात या विमानांचा सुमारे २० वर्षांचा सेवाकाळ संपल्यावर वायुसेनेत मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच विदेशी बनावटीच्या विमानांवरील अवलंबन कमी व्हावे हासुद्धा विचार त्यामागे होता. एलसीएसाठी शक्तिशाली जेट इंजिन तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. त्यासाठी स्वदेशी कावेरी नावाच्या इंजिनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे तेजससाठी अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या एफ-४०४ या आफ्टरबर्निग टबरेफॅन इंजिनची निवड करण्यात आली.
मे इ.स. १९९८ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीबाबत भारतावर बंदी आणण्यात आली. त्यामुळे या विमानाचे सर्व भाग भारतात बनविणे भाग पडले. तसेच, भारताला यापूर्वी असे आधुनिक विमान बनविण्याचा अनुभव नव्हता. यामुळे एल.सी.ए. पूर्ण होण्यात उशीर झाला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या विमानाचे तेजस असे नामकरण केले. सुरवातीला याचे नाव केवळ एल सी ए (लाइट कॉम्बॅट एरक्राफ्ट/हलके लढाऊ विमान) असे होते. गोव्यात पार पडलेल्या चाचण्यात या विमानाने १३५० कि.मी. प्रति तास वेगाने प्रवास करून ध्वनी पेक्षा जास्त वेग (सुपरसॉनिक) प्राप्त केला. सध्या या विमानांची भारतीय नौदलासाठी निर्मिती होत आहे. तेजसच्या प्रारूपाचे (प्रोटोटाइप) पहिले यशस्वी उड्डाण ४ जानेवारी २००१ रोजी झाले. त्यानंतरही त्यात अनेक बदल करीत तेजसची मार्क-१ ही आवृत्ती हवाई दलात वापरासाठी तयार झाली. २००३ साली एलसीएचे तेजस असे नामकरण झाले. तेजसची मार्क-१ या आवृत्तीच्या उत्पादनाला परवानगी मिळून २०१६ साली हवाई दलात ४५ व्या स्क्वॉड्रनची उभारणी करून त्यात तेजस दाखल करण्यात आले. तेजसच्या मार्क-१-ए आणि मार्क-२ या अधिक सुधारित आवृत्ती बनवल्या जात आहेत. त्यात अधिक शक्तिशाली इंजिन, सुधारित यंत्रणा आणि शस्त्रास्त्रे बसवली जात आहेत. तेजसची नौदलासाठीची आवृत्तीही तयार करण्याचा प्रयत्न झाला.
तेजसचा आकार डेल्टा विंग टेक्नॉलॉजी ( यात विमानाचे पंख हे त्रिकोणा सारखे दिसतात) प्रमाणे आहे. विमान बांधताना अ‍ॅल्युमिनियम लिथियम मिश्रधातू, कार्बन-फायबर कंपोझिट, अर्थात कार्बन-फायबर मिश्रण, आणि टिटॅनियम-मिश्रधातूचे पोलाद वापरण्यात आले. कार्बन फायबर मिश्रणाचे प्रमाण तेजसमध्ये साधारण ४५ % असून या वर्गातील लढाऊ विमानांत जवळपास सर्वाधिक आहे. जीई-४१४ हे अमेरिकन जेट इंजिन या विमानाला बसवले आहे. एलसीएचा मूळ सांगाडा (एअरफ्रेम) अ‍ॅल्युमिनियम-लिथियम मिश्रधातू, कार्बन कॉम्पोझिट आणि टायटॅनियमचे मिश्रधातू यातून बनवला आहे. त्यामुळे तो हलका आणि मजबूत आहे. तेजस विमानाच्या कॉकपीटच्या वैशिष्टय़पूर्ण काचेमुळे वैमानिकाला उड्डाणाच्या वेळी आजूबाजूचे दृष्य स्पष्टपणे दिसण्यास मदत होते. यावर बसविलेल्या हँड्स ऑन थ्रोटल अँड स्टिक या यंत्रणेमुळे प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी वैमानिकावरील कामाचा ताण कमी होतो. हेल्मेटच्या समोरील पडद्यावर (हेड-अप डिस्प्ले) अद्ययावत माहिती प्रदर्शित होते. ही माहिती यंत्रणा पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे. बहुविध प्रकारची माहितीही कॉकपीटमधील विविध पडद्यांवर प्रदर्शित होत राहते. यामुळे वैमानिकाला विमानाचे इंजिन, हायड्रॉलिक्स, इलेक्ट्रिकल, फ्लाइट कंट्रोल आदी बाबींविषयीचीही अद्यावत माहिती सदैव उपलब्ध होत राहते.
इतक्या वर्षांनंतरही तेजस अद्याप पूर्णपणे विकसित झालेले आणि युद्धात परिणामकारकता सिद्ध केलेले विमान नाही. त्यामुळे त्याच्या उपयोगितेबद्दल आणि वेळेत उत्पादनाबद्दल हवाई दल साशंक आहे. तसेच त्याची किंमतही काहीशी अधिक, म्हणजे एका तेजस मार्क-१-ए विमानासाठी ४६३ कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे सध्या तातडीची गरज भागवण्यासाठी फ्रान्सकडून राफेल विमाने घ्यावी लागत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा