जत, २१ फेब्रुवारी २०२३ : खैराव (ता. जत) येथे एकाने तळपत्या उन्हात बारा तासांत तब्बल १७ टन ३०० किलो ऊस तोडण्याचा विक्रम केला आहे. त्या ऊसतोड मुजराचे नाव ईश्वर सांगोलकर असे आहे. या ऊसतोड मजुराचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा विक्रम समजताच ऊसतोड मजुराचा उसाच्या फडात जाऊन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी सत्कार केला. यावेळी माजी सरपंच मारुती जमदाडे, उपसरपंच विश्वास खिलारे, नवनाथ चौगुले आदी उपस्थित होते.
यांत्रिकीकरणाच्या युगात अंगमेहनतीच्या बळावर ऊसतोडीचा विक्रम करणारे ईश्वर सांगोलकर हे गेल्या वीस वर्षांपेक्षा अधिक काळ ऊसतोड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. यावेळी त्यांच्याकडून ऊसतोड मजुरांच्या व्यथा जाणून घेतल्या. अंगमेहनत करणाऱ्या ऊसतोड मजुरांना शासनाकडून सुविधा देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही यावेळी संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली.
वारणा पट्टयात १२ तासांत १६ टन ऊसतोडीचा विक्रम पाठीशी असलेल्या खैरावचे सुपुत्र ईश्वर सांगोलकर यांना आपल्या भागात ऊसतोडीचा विक्रम करण्याचा मानस होता. याच हेतूने सकाळी सहा वाजता हातात कोयता घेऊन ऊसतोडीला सुरवात केली. पांडुरंग चौगुले यांच्या शेतात ईश्वर सांगोलकर यांचा कोयता आपला चमत्कार दाखवीत होता. बारा तासांत १७ टन ३०० किलो ऊस एकट्या पट्टयाने तोडला. या विक्रमाबद्दल राजारामबापू कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी भेटून ईश्वर सांगोलकर यांचा सत्कार केला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर