हाथरस, ३० सप्टेंबर २०२०: उत्तर प्रदेश मधील हाथरस मध्ये एका दलित मुलीवर झालेल्या बलात्कारावरून संपूर्ण देशात आक्रोश व्यक्त केला जातोय. सोशल मीडिया पासून ते इतर वेगवेगळ्या माध्यमातून लोक आपली नाराजी व्यक्त करत आहे. आता यातच प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलीय. जावेद अख्तर यांनी अप्रत्यक्षरीत्या उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्न उपस्थित केलेत.
जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटर वर लिहिले की, “उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय रात्री अडीचच्या सुमारास पीडितेवर अंत्यसंस्कार केले. पोलिसांचं हे कृत्य आपल्यासाठी एक प्रश्न उभा करतोय. पोलिसांना अशा कोणत्या गोष्टीमुळे आत्मविश्वास मिळाला की असं कृत्य करून देखील ते या मधुन वाचू शकतील. काय कोणी त्यांना हे करण्यासाठी, वाचवण्यासाठी आश्वासन दिलं आहे?”
या घटनेवर बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यानं देखील आपली प्रतिक्रिया दिली तो म्हणाला की, “हे सर्व थांबणे गरजेचं आहे, हा सर्व प्रकार फालतुपणाच्या ही पलीकडचा आहे.” तसंच अक्षय कुमारनंही ट्विट करत याबाबत आपलं वक्तव्य केलं तो म्हणाला की, “हाथरस बलात्कार प्रकरणातील इतकी निर्दयता पाहून चीड आणि संताप जाणवतोय. हे कधी थांबणार..? आपले कायदे आणि त्यांमधील शिक्षा इतक्या कडक व्हायला हव्यात की असं कृत्य करण्यापूर्वी नराधमांमध्ये थरकाप उडाला पाहिजे. या प्रकरणातील दोषींना फाशी दिली जावी. आपल्या बहिणीच्या आणि मुलींच्या सुरक्षितेसाठी आपण आवाज उठवला पाहिजे. कमीतकमी आपण एवढं तर करू शकतो.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे