ठाणे, दि. १६ जुलै २०२० : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत जातोय मात्र या महामारीत आणखी एक प्रश्न सध्या ठाणे महानगरपालिके समोर उभा आहे तो म्हणजे धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींचा. या पावसाळ्यात काय होणार ? ऐन पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यात येत आहेत. सध्या ७९ पैकी ३५ अति धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या आहेत. आणखी ४४ इमारतींवर येत्या काही दिवसांमध्ये कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जाते.
ठाण्यातील मुंब्रा, कळवा आणि वागळे इस्टेट या क्षेत्रामध्ये पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अति धोकादायक तसेच धोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांचे स्थलांतर करून त्या रिकाम्या करण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
महापालिकेने घोषित केलेल्या धोकादायक इमारतींपैकी सी-१ हा अति धोकादायक इमारतींचा प्रकार आहे. या वर्षीच्या सर्वेक्षणामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील नऊ प्रभाग समित्यांमधील सुमारे ४ हजार ३०० धोकादायक इमारती आणि अति धोकादायक ७९ इमारतींचा समावेश आहे. त्यापैकी ३५ इमारती रिक्त केल्या आहेत. आता केवळ ४४ इमारती शिल्लक आहेत. त्याही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे सी-२-ए मध्ये देखील ११३ इमारतींचा समावेश आहे. या इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र कोरोना आणि पावसाळ्याच्या दुहेरी संकटामुळे अनेक इमारतींमधील रहिवाशांनी यास नकार दिला आहे. अशा वेळी ज्या इमारती अतिधोकादायक स्थितीमध्ये आहेत त्या शक्य होईल तितक्या लवकर रिकाम्या करण्याची मोहीम सध्या ठाणे महानगरपालिकेने हाती घेतली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे