जेजुरी शहराला सोमवार पासून होणार दोन दिवसाआड पाणीपुरवठा

पुरंदर, पुणे ७ जानेवारी २०२४ : नाझरे धरणातील पाणी साठा संपुष्टात असल्याने जेजुरी शहरावर पाणी टंचाई चे सावट निर्माण झाले होते. पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या पुढाकारातून मांडकी योजनेतून पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. या प्रयत्नांना यश मिळाले असून शनिवारी दिनांक ६ रोजी मांडकी डोहातुन जेजुरीतील पाणीपुरवठा करणाऱ्या जल शुध्दीकरण केंद्रावर पाणी पोहोचले. काँग्रेस गटनेते सचिन सोनवणे, माजी नगरसेविका रुक्मिणी जगताप, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी भंडारा उधळून पाण्याचे पूजन केले. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब दरेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष ईश्वर दरेकर, सुशील राऊत, देवसंस्थानचे माजी विश्वस्त पंकज निकुडेपाटील, नगरपालिकेचे पाणीपुरवठा पर्यवेक्षक राजेंद्र दोडके, बाळू कांबळे, दशरथ कुरूटकर, प्रमोद डिखळे, प्रशांत कुदळे आदी उपस्थित होते.

सध्या जेजुरी शहराला नाझरे (मल्हारसागर) जलाशयाच्या मृतसाठ्यातून तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. तर गेली पाच वर्षापासून मांडकी डोहा वरील पाणीउपसा करणाऱ्या पंपाचे दीड ते दोन कोटी रुपये वीजबिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तर पाईपलाईनची सुद्धा दुरवस्था झाली होती. त्यामुळे भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र आमदार संजय जगताप यांच्यामध्यस्थी व प्रयत्नामुळे थकीत विजबिलावर तोडगा निघून प्रश्न मार्गी लागलाअसून नगरपालिका प्रशासनाने सुमारे ४० लाख रुपयाची विजबिलाची थकीत रक्कम भरलीआहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व नगरपालिका प्रशासन यांच्या निधीतून निकृष्ट व नादुरुस्त असलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरवासीय व भाविकांना पाणीपुरवठा नियोजन पद्धतीने करण्यात येणार असल्याचे गटनेते सचिन सोनवणे यांनी सांगितले.

जेजुरी शहराला सध्या दररोज ५०लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे ,मात्र मांडकी डोह ते जेजुरी असे सुमारे २३ कि. मी.अंतर असल्याने पाणी उपलब्ध होईल तसे पाणीपुरवठा नियोजन करण्याची मागणी पालिका प्रशासनाला करणार असून सध्याच्या काळात ही योजना फार खर्चिक काम आहे .तसेच अंतर जास्त असल्याने सतत दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी नियमित भरून सहकार्य करावे. आम्ही माजी लोकप्रतिनिधी आहोत सध्या प्रशासकीय कालावधी असला तरी ही योजना कार्यान्वित करून पाणी पुरवठा करण्यात येईल हा शहरवासीयांना दिलेला शब्द आम्ही पाळला असल्याचे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा