महिला प्रीमियर लीगमध्ये जेस जॉन्सनची अष्टपैलू खेळी; दिल्लीचा यूपी वॉरिअर्सवर ४२ धावांनी विजय

मुंबई, ८ मार्च २०२३ : महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सने दुसरा विजय नोंदविला. दिल्लीने यूपी वॉरियर्सचा ४२ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मेग लॅनिंग आणि जेस जॉन्सन यांच्या धडाकेबाज खेळीमुळे दिल्लीने यूपीला २१२ धावांचे मोठे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात यूपीचा संघ २० षटकांत ५ गडी गमावून १६९ धावाच करू शकला. एलिसा हिलीलाही या लीगमधील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.

ताहिला मॅकग्रा यूपीसाठी एकटी लढताना दिसली. ताहिला ९० धावांवर नाबाद राहिली. महिला प्रीमियर लीग २०२३ मधील ही सर्वांत मोठी धावसंख्या आहे; मात्र असे असतानाही ती आपल्या संघाला मोठ्या पराभवापासून वाचवू शकली नाही.

प्रथम फलंदाजी करताना लॅनिंगने शेफाली वर्मासह दिल्लीला दमदार सुरवात करून दिली; परंतु शेफालीची बॅट यूपीविरुद्ध गोळीबार करू शकली नाही आणि सलामीवीर १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर लॅनिंगने मारिजाने कॅप, जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यासोबत भागीदारी केली. कॅपच्या रूपाने दिल्लीला ९६ धावांवर दुसरा धक्का बसला. यानंतर ११२ धावांवर दिल्लीची तिसरी विकेट लॅनिंगच्या रूपात पडली. लॅनिंग ७० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. लॅनिंगने या लीगमधील सलग दुसरे अर्धशतक झळकाविले.

लॅनिंग पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, जेमिमाने प्रथम कॅप्सी आणि नंतर जेस जॉन्सनसोबत भागीदारी केली. जेमिमा आणि जेस जॉन्सन यांच्यात ३४ चेंडूंत ६७ धावांची अखंड भागीदारी झाली आणि या भागीदारीच्या जोरावर दिल्लीने निर्धारित षटकांत ४ गडी गमावून २११ धावा केल्या. जेमिमाने २२ चेंडूंत ३४ आणि जेस जॉन्सनने २० चेंडूंत ४२ धावा केल्यानंतर नाबाद राहिली.

२१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीची सुरवात खूपच खराब झाली. स्टार खेळाडू, विश्वविजेती आणि संघाची कर्णधार ॲलिसा हिली २४ धावांवर बाद झाली. जेस जॉन्सनने त्यांची शिकार केली. २९ धावांवर मोठा फटका बसल्यानंतर यूपीची लय बिघडली. मारिजाने काप आणि शिखा यांनीही त्यांना चांगली साथ दिली. ताहिलाशिवाय हिलीने २४ आणि देवीकोने २४ धावा केल्या. जेस जॉन्सनने ४३ धावांत ३ विकेट्स घेतल्या.ज्ञअष्टपैलू कामगिरी करणाऱ्या जेस जॉन्सनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा