जालन्यात विजेचा शॉक लागून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू

जालना , दि.१४ जून २०२० : पावसामुळे घराला गळती लागल्याने पत्र्यावर कापड टाकण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथे शनिवारी ( दि. १३) रोजी घडली. सोहिल ( गबू ) भाऊसाहेब जाधव ( वय१६ ) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास सोहिल हा आपल्या राहत्या घराच्या छताला गळती लागल्यामुळे छतावर पानकापड टाकण्यासाठी गेला. छतावरून गेलेल्या एका सर्व्हिस केबलला सोहिलच्या मानेचा स्पर्श झाला. त्यातच छतावरील लोखंडी पत्रे देखील ओले असल्याने सोहिल चिटकून राहिला आणि त्यातच घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान , नातेवाईकांनी सोहिल याला खाजगी वाहनातून भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील आरोग्य अधिकारी डॉ.ए.ए.मुळे यांनी सोहिल मरण पावल्याचे सांगितले. त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

सोहिलच्या पश्चात आई, वडील, काका, काकू, दोन छोट्या बहीण असा परिवार आहे. साहिल नुकतीच नववीची परीक्षा उत्तीर्ण होऊन दहावीच्या वर्गात प्रवेश घेणार होता . सोहिल हा एकुलता एक असल्याने जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा