झारखंड : धनबादमधील क्लिनिकला भीषण आग; डॉक्टर दाम्पत्यासह ६ जणांचा होरपळून मृत्यू

झारखंड, २८ जानेवारी २०२३ झारखंडच्या धनबादमधील एका क्लिनिकमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत क्लिनिकमध्ये तैनात असलेल्या डॉक्टर दाम्पत्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना धनबाद शहरातील बँक मोड पोलीस स्टेशन हद्दीतील हाजरा क्लिनिकमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

अपघाताच्या वेळी डॉ. विकास हाजरा आणि रुग्णालयातील इतर कर्मचारी आपापल्या खोलीत झोपले होते. याच दरम्यान रुग्णालयातील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेच्या वेळी क्लिनिकमध्ये एकूण २५ हून अधिक रुग्ण दाखल होते.

या घटनेची माहिती रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना समजताच सर्व रुग्णांना तातडीने बाहेर काढून दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आले. यामुळे त्यांचा जीव वाचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत डॉ. विकास हाजरा यांच्या पुतण्याचाही मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी तो कोलकाताहून धनबादला त्याच्या मामाकडं आला होता.

  • मुख्यमंत्री हेमंत सोरेनकडून शोक व्यक्त

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी धनबादमधील आरसी हाजरा मेमोरियल हॉस्पिटलच्या निवासी संकुलात लागलेल्या आगीतील मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. सीएम सोरेन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की,
धनबादमधील हाजरा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरा लागलेल्या आगीत प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य डॉ. विकास आणि डॉ. प्रेमा हजरा यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून हृदय व्यथित झाले आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा