सकारात्मक विचार करणारी व्यक्ती कधीही एकटी नसते. आज १८ जून देशाचे पहिले स्वातंत्र्य समर म्हणून ओळख असलेल्या १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात “मेरी झांसी नाही दूंगी” हे ब्रीद वाक्य सध्य करत आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची आज पुण्यतिथी. राणी लक्ष्मीबाई म्हणताच आपल्या डोळ्या समोर येते ती बाळाला पाठीशी घेतलेली आणि हातात तलवार घेऊन धाडसाने लढणारी शूर स्त्री.
झाशीची राणी लक्ष्मीबाईयांचे खरे नाव मनकर्णिका तांबे होते. झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले,आणि तेच रूढ झाले. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी राणी लक्ष्मीबाई झाशीच्या प्रमुख झाल्या. त्यांचे युद्ध कौशल्य पाहून ब्रिटीश आर्मी ऑफिसर ह्यूज रोज खूप प्रभावित झाला होता.धोरणी,चतुर,युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व आणि उत्तम नेतृत्व गुण असणारी राणी लक्ष्मीबाई असं म्हटलं जातं. त्या जन्मतः राजघराण्यातल्या नव्हत्या मात्र राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये त्यांची जडण-घडण झाली, त्यामुळे तलवार दांडपट्टा,बंदूक चालवण्याचे शिक्षण त्यांना मिळाले.
कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारीतही वाकबगार होत्या १८५७ च्या ब्रिटिश इस्ट इंडिया या कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावात राणी लक्ष्मीबाई या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले. पुरुषी वेष धारण करून रणांगणात उतरणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंचे शौर्य पाहून ब्रिटिशही अवाक झाले. राणी लक्ष्मीबाई यांच्यावर अनेक काव्य पोवाडे रचले गेले. इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणून उत्तर प्रदेश सरकारचा रानी लक्ष्मीबाई पुरस्कार (कुस्तीविद्येत प्रवीण असलेल्या साक्षी मलिक यांना हा पुरस्कार मिळाला आहे.), भारत सरकारचा राणी लक्ष्मीबाई स्त्री-शक्ती पुरस्कार, मध्यप्रदेश सरकार वीरता दाखविणाऱ्या स्त्रीला ’वीरांगना लक्ष्मीबाई राष्ट्रीय पुरस्कार (माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणाऱ्या बच्छेंद्री पाल यांना हा पुरस्कार मिळाला होता.) असे पुरस्कार प्रदान केले जातात.