जिल्हा परिषदेवर ‘दादां’ ची हुकूमत?

पुणे : राज्यातील सत्तास्थापनेतील घडामोडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर संपूर्ण वातावरण ढवळून निघाले. आता पुणे जिल्हा परिषदेत दोन गट पडणार? हुकूमत कुणाची राहणार? नवनिर्वाचीत अध्यक्षपदावर त्याचा परिणाम होणार का? या विचाराने जिल्हा परिषद सदस्य ‘साहेबांबरोबर जाणार की दादां’ बरोबर अशी चर्चा सुरू झाली.
मात्र, अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाले आणि सदस्यांच्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला. एवढच नव्हे तर पुणे जिल्हा परिषदेवर ‘दादां’चीच हुकूमत राहणार यावर सदस्यांनी शिक्‍कामोर्तब केला.

डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह उपाध्यक्ष आणि सभापतीपदाची निवड होणार आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बंड करत भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. या बंडाचे पडसाद ग्रामीण भागापासून राज्यात उमटले. यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेत्यांबरोबर पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी दादांची भेट घेतली.
अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांनी भेट घेतली असता, ‘लवकरच सर्व काही सुरळीत होईल’ असे सांगण्यात आले. तसेच काही पदाधिकारी आणि व्यक्‍ती अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. तीन दिवसांनी पवार यांनी पुन्हा घरवापसी केली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत आल्यावर जिल्हा परिषदेची सुत्रे त्यांच्याकडे राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सत्तास्थापनेनंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीसह विषय समित्यांच्या सभापतींची निवडीला आता वेग येणार आहे. अध्यक्षपदासाठी महिला सदस्यांकडून तालुक्‍यातील नेते मंडळीच्या भेटी-गाठी सुरू झाल्या असून, मावळ तालुक्‍यासह हवेली, आंबेगाव यासह अन्य तालुक्‍यांतील इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा