जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला हवेलीमधील गावातील सरपंचांचा विरोध..!

उरळीकांचन, दि. ६ जून २०२०: हवेलीमधील उरुळी कांचन, लोणी काळभोर, वाघोली या गावांच्या सरपंचांनी, सध्याच्या काळात आठवडे बाजार सुरु करण्यास विरोध दर्शविला आहे.

उरुळी कांचन : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले गावपातळीवरील आठवडी बाजार पुन्हा सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या होत्या. यामुळे शेतकरी व सर्वसामन्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. आजपासून पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरू होणार आहे. मात्र, आठवडे बाजार भरत असलेल्या ग्रामपंचायतींपैकी काही अपवाद वगळता सर्वच मोठ्या ग्रामपंचातींच्या सरपंचानी या निर्णयाबद्दल नापंसती व्यक्त केली आहे. हवेलीमधील उरुळी कांचन, लोणी काळभोर, वाघोली या गावांच्या सरपंचानी, सध्याच्या काळात आठवडे बाजार सुरु करण्यास विरोध दर्शविला आहे.

“मिशन बिगीन अगेन” मोहिमेअंतर्गत जिल्हातील कंन्टेमेन्ट झोन प्रतिबंधीत क्षेत्र वगळता गाव पातळीवरील सर्व प्रकारचे आठवडे बाजार सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. आठवडे बाजारासाठी सध्या उपलब्ध असलेल्या जागांचा विचार करता सोशल डिस्टंन्सिंग अथवा दोन विक्रेत्यांमध्ये पुरेशी जागा ठेवणे शक्यच होणार नाही. अशा परिस्थितीत आठवडे बाजार सुरु केल्यास, ग्रामीण भागातही काही दिवसात कोरोनाच्या फैलाव अधिक होईल अशी भीती अनेक सरपंचांनी ‘न्यूज अनकट’ कडे व्यक्त केली आहे.

पुढील काही दिवसात कोरोनाची साथ पुर्णपणे आटोक्यात आल्यानंतरच आठवडे बाजार सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे वाघोलीच्या सरपंच सुलभा उबाळे, उरुळी कांचनच्या सरपंच राजश्री वनारसे उपसरपंच जितेंद्र बडेकर व लोणी काळभोरच्या सरपंच अश्विनी गायकवाड यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तेरा मार्च रोजी गावपातळीवर भरणारे सर्वच प्रकारचे आठवडे बाजार बेमुदत बंद करण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ४) रात्री उशीरा सर्वच आठवडे बाजार सुरु करण्याचे आदेश दिले होते. मात्र आठवडे बाजार सुरु झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो या भीतीने अनेक गाव कारभाऱ्यांनी आठवडे बाजार सुरु करण्यास नकार दिला आहे.

सरपंच सुलभा उबाळे म्हणाल्या की, वाघोली गाव पुणे शहरालगत असल्याने या गावात यापुर्वीच कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. सध्या ग्रामपंचायत प्रशासनाने काळजी घेतल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबला आहे. वाघोलीचा आठवडे बाजार हा सर्वात मोठा बाजार आहे. विविध गावात अनेक विक्रेते व ग्राहक आठवडे बाजारात येत असल्याने, गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण जाणार आहे. आठवडे बाजाराची जागा व होणारी गर्दी पाहता नियम पाळणे कठीण होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत आठवडे बाजार सुरु करण्यास आमचा विरोध आहे. कोरोनाचा धोका वाढेल सध्याच्या परिस्थितीत बाजार सुरू करणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण ठरेल, असे सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा