तथ्य शोधन समितीच्या अहवालातून स्पष्ट
नवी दिल्ली : जेएनयूमध्ये ५ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या तथ्य शोधन समितीने या हल्ल्याला विद्यापीठाच्या कुलगुरूंचाच पाठींबा होता, अशा नोंदी अहवालात आढळल्या आहेत. याबाबत एका संकेतस्थळाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात या गोष्टी उघड झाल्या आहेत.
या प्रकरणाबाबत तथ्य शोधन समितीची निरीक्षणे व त्यांना मिळालेले पुरावे हे या घटनेची चौकशी करणाऱ्या समितीशी मिळते जुळते आहेत. तसेच जेएनयूमध्ये हिंसाचार करण्यासाठी गुंडांची शिस्तबद्धरित्या जमवाजमव करण्यात आली होती. शिवाय या गुंडांना विद्यापीठात तसा प्रवेशही देण्यात आला होता. तसेच जेएनयूची सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या ‘सायक्लोप्स पी लिमिटेड’ या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी या गुंडांना मदत केली होती. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना मारहाण व मालमत्तांची तोडफोड करणाऱ्यांमध्ये विद्यापीठातील काही शिक्षकही सामील होते असे चौकशी समितीला आढळून आले आहे. ही निरीक्षणेही तथ्य शोधन समितीला आढळलेली आहेत. याबाबत “द वायर” ने वृत्त दिले आहे.
‘जेएनयूत हिंसा होण्याअगोदर व्हॉट्स अप ग्रुपवर ‘फ्रेंड्स ऑफ आरएसएस’ व ‘युनिटी अगेंस्ट लेफ्ट’ असे दोन ग्रुप तयार करण्यात आले होते. या ग्रुपच्या माध्यमातून जमाव जमा केली गेली. त्यांना हिंसेला प्रवृत्त करण्यात आले होते. तसेच या ग्रुपमध्ये जेएनयूचे काही प्राध्यापकही सामील झाले होते. त्यांनीही विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करणारे संदेश टाकले होते’, असे या अहवालात निरीक्षण करण्यात आले आहे.
या तथ्य शोधन समितीने जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीश कुमार हेच या एकूण हिंसाचारामागचे कर्तेधर्ते (मास्टरमाइंड) असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.
सन २०१६ मध्ये जगदीश कुमार यांची जेएनयूच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अत्यंत शिस्तबद्धरित्या उजव्या विचारसरणीच्या काही शिक्षकांना विद्यापीठात नियुक्त केलेलं असल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे. त्यातील काहींकडे पर्याप्त ‘मेरिट’ही नव्हते. तसेच कुलगुरूंनी आपल्या जवळच्या व्यक्तींनाच बढतीही दिली. एवढेच नव्हे तर विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर त्यांनी अनेक निर्णय जबरदस्तीने लादले. हे निर्णय लादण्याअगोदर विद्यार्थी संघटनांची मते त्यांनी अजमावून घेतली नाहीत. त्यांच्याशी चर्चा केली नाही. निवडणुकांच्या माध्यमातून निवडून आलेल्या विद्यार्थी सदस्य व शिक्षक संघटनांशीही त्यांनी कधी जुळवून घेतले नाही की त्यांच्याशी चर्चा केली नाही, असे या अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याच्या चर्चा आता सर्वत्र होऊ लागल्या आहेत.