नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ५ जानेवारीला झालेला हिंसाचार हा सरकार पुरस्कृत होता, असे काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने म्हटले आहे.
या हिंसाचार प्रकरणी कुलगुरू एम.जगदीश कुमार यांना निलंबित करून त्यांच्याविरोधात चौकशी करावी, असेही या समितीने म्हटले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचार प्रकरणी काँग्रेसने ४ सदस्यांची सत्यशोधन समिती नेमली होती. या समितीने ५ जानेवारीच्या प्रकाराची सखोल चौकशी केली आहे.
समितीच्या सदस्या सुश्मिता देव म्हणाल्या, कुलगुरू जगदीश कुमार यांना निलंबित करून कुलगुरूंविरोधात फौजदारी चौकशी करण्यात यावी.
साबरमती वसतिगृह, पेरियार वसतिगृह व इतर ठिकाणी धुडगूस घालणाऱ्या हल्लेखोरांना सामील असलेल्या सुरक्षा कंपनीचे कंत्राट रद्द करावे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचार सरकार पुरस्कृत होता हे स्पष्ट झाले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जी शुल्कवाढ करण्यात आली ती पूर्णपणे रद्द करण्यात यावी.
सत्यशोधन समितीत खासदार व एनएसयूआयचे माजी अध्यक्ष हिबी इदेन, जेएनयू एनएसयूआयचे माजी अध्यक्ष व खासदार सय्यद नासीर हुसेन, माजी एनएसयूआय अध्यक्ष व माजी डीयूएसयू अध्यक्ष अमृता धवन यांचा समावेश होता.