जुन्नरच्या आजी-माजी आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी, रस्त्याच्या भूमिपूजनावरुन आमनेसामने

पुणे, ६ ऑगस्ट २०२३ : जुन्नरचे आजी-माजी आमदार रस्त्याचे भूमिपूजन करण्यावरुन समोरासमोर भिडले. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची कार्यक्रमस्थळी प्रचंड घोषणाबाजी केली. शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनवणे विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांच्यात रस्त्याच्या भुमीपूजनावरुन चांगलाच वाद उफाळूण आला. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात संबंधित प्रकार घडला. चर्चा करायची नसेल तर मला गरज नसल्याचे शरद सोनवणेंनी बेनकेंना सूनवले. तर रस्ता करत असताना अडचणींवर मात करुन पुढे जात असताना कुणाच्या सत्काराची गरज नसल्याचा पलटवार बेनकेंनी केला. यावरुन दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. यावेळी कार्यक्रमस्थळी आळेफाटा पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. दुसरीकडे दोन आमदारांच्या वादात आमचा काय दोष? आमचा रस्ता कोण करणार? असा सवाल ग्रामस्थांनी केला.

जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे कोणतेही विकास काम न करता आमदार अतुल बेनके यांनी खोटे श्रेय घेण्याचे खोटे काम केले आहे. आमदार अतुल बनके यांनी गेल्या चार वर्षांमध्ये जुन्नर तालुक्यात एक रुपयाचेही विकास काम केले नाही. आमदार बेनके यांच्या अशा वागण्याने शिवजन्मभूमीत त्यांची लाज गेली आहे, असा घणाघात शरद सोनवणे यांनी केली.

जुन्नरच्या बेल्हे गावात विद्यमान आमदारांनी कोणतीही काम केलेले नाही. पण त्या कामांचे श्रेय घेण्याचे खोटे काम त्यांनी केले. अधिकाऱ्यांनी त्यांना वेळोवेळी सांगितले की, संबंधित काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मंजूर झाले आहे. मी विद्यमान आमदार असताना ते अतिशय जिकरीचे काम केले होते. बेल्हे गावावरुन थेट जेजुरी असा तो रस्ता मंजूर केला होता. अष्टविनायकचे रस्ते देखील देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मंजूर केले होते. त्यासाठी त्यांनी विशेष नीधी दिला होता, असे शरद सोनवणे म्हणाले.

हे गाव शिवकालीन असल्याने त्या गावात रस्ता नेत असताना थोड्या अडचणी आल्या. त्यांनी आज भूमिपूजन ठेवले तेव्हा त्यांना अधिकाऱ्यांना सांगितले होते की, कोणत्याही प्रकारची हालचाल करु नका. खरेतर या आमदाराने गेल्या चार वर्षात कोणतही काम केले नाही. सरकारमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र काम करत आहेत. कमीत कमी या गोष्टीचा त्यांना विसर पडता कामा नये, असेही शरद सोनवणे म्हणाले.

शरद पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनीदेखील या वादावर प्रतिक्रिया दिली. जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील रस्ता काही लोकांनी दोन वर्षे रखडवला होता. पूर्वी मंजूर झालेला तो रस्ता रद्द झाला होता. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन नव्याने त्या रस्त्याची मंजुरी केली आणि रस्ता चालू करायला गेलो होतो. तर मागील वेळेस ज्या लोकांनी रस्ता रखडविला होता ते लोक पुढे आले. बेल्हेमधील रस्त्याचे भूमिपूजन करायचे आणि कामाला सुरुवात करायची होती. हे ग्रामस्थांनी ठरविले होते, असे अतुल बेनके म्हणाले.

आज भूमिपूजन झाले. उद्यापासून कामाला सुरुवात होणार आहे. माजी आमदार शरद सोनवणे यांच्या पोटात दुखत आहे. त्यातून त्यांनी हे कृत्य केले आहे. जुन्नर तालुका ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी आहे. जुन्नरच्या भूमीला असे शोभत नाही. सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की, विकास कामांना खोडा न टाकता पुढे जाण्याची भूमिका घ्यावी, असेही अतुल बेनके म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा