ज्येष्ठ कामगार नेते डॉ.दादा सामंत यांची नैराश्यातून आत्महत्या

मुंबई, दि.२३मे २०२०:  ज्येष्ठ कामगार नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे डॉ. दादा सामंत (वय ९२) यांनी नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

आत्महत्ये अगोदर दादा सामंत यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मधून ही बाब समोर आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्यविषयक समस्यांमुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.
दादा सामंत यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समजते. पोलिसांकडून रात्री या वृत्तास दुजोरा मिळाला नव्हता. या प्रकरणी दहिसर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दादा सामंत यांच्या पश्चात पत्नी प्रमोदिनी, तीन विवाहित कन्या गीता, नीता आणि रुता, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

दादा सामंत यांचा जन्म १९३० मध्ये झाला. ते मुंबईतील कामगार नेते आणि कामगार कायद्याचे अभ्यासक होते. १९८१ मध्ये त्यांनी मुंबईत झालेल्या गिरणी संपानंतर दादा सामंत यांनी ग्वाल्हेर येथील मिलमधील नोकरी सोडून दत्ता सामंत यांच्यासोबत युनियनमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.

डॉ. दत्ता सामंत यांची जानेवारी १९९७ मध्ये हत्या झाली. त्या हत्येनंतर १८ जानेवारी १९९७ ते ९ मे २०११ पर्यंत दादा सामंत यांनी कामगार आघाडी आणि संलग्न युनियनचे अध्यक्षपद सांभाळले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा