नवी दिल्ली : के-४ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. मागच्या सहा दिवसातील ही दुसरी यशस्वी चाचणी आहे.
भारत आपल्या पाणबुडयांच्या ताफ्यासाठी पाण्याखालून हल्ला करु शकणारी दोन क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. के-४ त्यापैकी एक आहे. के -४ ची मारक क्षमता ३५०० किलोमीटर आहे तर दुसऱ्या क्षेपणास्त्राची रेंज ७०० किलोमीटर आहे. ३ मीटर लांब क्षेपणास्त्र एक टनापर्यंत अण्वस्त्र वाहून नेऊ शकते.
पाणबुडीमधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता खूप महत्वपूर्ण आहे. यामुळे भारत आता हवा, जमीन आणि पाण्याखालूनही अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम झाला आहे.
आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे पाणबुडीमधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता होती. भारताचा आता या देशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे.
अण्वस्त्र पाणबुडयांवर के -४ क्षेपणास्त्राची तैनाती करण्याआधी डीआरडीओकडून या क्षेपणास्त्राच्या आणखी चाचण्या करण्यात येतील.
सध्या भारतीय नौदलाची आयएनएस अरिहंत ही अण्वस्त्र पाणबुडी कार्यरत आहे.