PCMC Fines ₹1.48 Crore for Littering in Cleanliness Drive: पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे! शहर विद्रूप करणाऱ्या व्यक्ती आणि व्यावसायिक आस्थापनांवर आरोग्य विभागाने वर्षभरात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत तब्बल 1 कोटी ४८ लाख ८५ हजार ७०० रुपये इतकी विक्रमी वसुली केली आहे. महापालिकेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे, जो ‘स्वच्छ भारत’ अभियानाप्रती पिंपरी-चिंचवडच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांनी एकूण ७,२१४ व्यक्ती आणि आस्थापनांवर ही कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका व शौच करणे, राडारोडा व कचरा टाकणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, अनधिकृत जाहिरातींची भित्तिपत्रके लावणे आणि बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर करणे यांसारख्या प्रकारांमुळे शहर विद्रूप होत होते. याला आळा घालण्यासाठी ही कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात सक्रियपणे सहभागी असून, शहरात ‘इंदूर पॅटर्न’ राबवला जात आहे. ‘कचराकुंडीमुक्त शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे. १८ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते यंत्राद्वारे साफ केले जातात, तर घरोघरचा कचरा संकलनाचे काम ठेकेदारांमार्फत सुरू आहे. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी आणि शहर अधिक स्वच्छ राहावे, या उद्देशाने ही दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, “नागरिकांनी उघड्यावर कचरा आणि राडारोडा टाकू नये. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करूनच तो गोळा केला जात आहे – ओला, सुका, घातक, प्लास्टिक आणि बायोमेडिकल अशा प्रकारे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावली जाते.”
गेल्या वर्षी ‘स्वच्छ भारत’ अभियानात देशाला १३वा आणि राज्यात तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचे यंदाचे स्थान १७ जुलैच्या निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र, दीड कोटींच्या या विक्रमी वसुलीने शहर स्वच्छतेसाठी महापालिकेचे प्रयत्न अधिक तीव्र झाल्याचे दिसून येते. तरीही काही नागरिक अजूनही रस्त्यावर कचरा टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे, ज्यामुळे स्वच्छतेच्या या लढ्यात नागरिकांच्या सक्रिय सहभागाची अजूनही गरज आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे